Faissal Khan Talk’s About Aamir Khan’s Extramarital Affair : अभिनेता फैजल खान काही दिवसांपासून चर्चेत आहे. फैजल खाननं त्याचा भाऊ अभिनेता आमिर खान व कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. आता फैजल खानने आमिर खानच्या खासगी आयुष्याबद्दही वक्तव्य केलं आहे.

फैजल खाननं आमिर खानसह ‘मेला’ चित्रपटात काम केलं होतं. आजही अनेक जण त्याला या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखतात. परंतु, फैजलला भाऊ आमिरप्रमाणे व्यावसायिक आयुष्यात तितकं यश मिळालं नाही. आमिर खाननं आजवर अनेक चित्रपटांत काम करीत प्रेक्षकपसंती मिळवली आणि तो बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

आमिर खानच्या खासगी आयुष्याबद्दल फैजल खानचा खुलासा

आता आमिरबद्दल त्याच्या भावानं पुन्हा गंभीर वक्तव्य केलं आहे. फैजलनं नुकत्याच दिलेल्या पत्रकार परिषदेत आमिरचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती दिली आहे. भावाच्या खासगी आयुष्याबद्दल तो म्हणाला, “माझ्या घरचे मला लग्नासाठी आग्रह करत होते. आमिर खान व रीना दत्त यांचं लग्न संपुष्टात आलेलं आणि त्याचे जेसिकाबरोबर संबंध होते. त्यातून त्याला मूलही आहे.”

फैजल खाननं कुटुंबाबरोबरचे सर्व संबंध संपवले

फैजल खाननं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत तो त्याच्या कुटुंबीयांबरोबरचे सर्व संबंध तोडत असल्याचं म्हटलं आहे. या पोस्टमधून तो म्हणाला, “सांगताना खूप वाईट वाटत आहे; पण मी माझ्या कुटुंबीयांबरोबरचे सर्व संबंध संपवले आहेत. सार्वजनिक नोटिशीद्वारे जाहीर केल्याप्रमाणे हा निर्णय कठीण असला तरी माझ्या आरोग्य आणि प्रगतीसाठी आहे. आता मी नवीन प्रवासाला सुरुवात करीत आहे. स्वातंत्र्य, आत्मसन्मानाचा हा प्रवास मी सकारात्मकतेने आणि सत्याच्या मार्गाने सुरू करत आहे.”

फैजल खानने काही दिवसांपूर्वीसुद्धा खान कुटुंबावर आरोप केले होते. त्याने त्याची आई, बहीण व भाऊ या सर्वांबद्दल वक्तव्यं केली होती. त्यानंतर खान कुटुंबानं अधिकृती स्टेटमेंट दिलेली. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार खान कुटुंबीय म्हणालेले, “आम्ही फैजलनं केलेल्या आरोपांमुळे दुखावले गेले आहोत. हे पहिल्यांदा घडत नसून, त्यानं यापूर्वीसुद्धा अशा चुकीच्या गोष्टी पसरवल्या आहेत. आम्हाला कुटुंब म्हणून याबद्दल स्पष्टीकरण देणं आणि अशा गोष्टींविषयी प्रतिक्रिया व्यक्त करणं गरजेचं वाटतं.”

फैजल खानबद्दल त्यांनी असंही सांगितलेलं की, “फैजलसंदर्भात घेण्यात आलेला प्रत्येक निर्णय संपूर्ण कुटुंबीयांनी एकत्र बसून घेतला होता. वैद्यकीय तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार त्याच्यासंदर्भात सर्व निर्णय घेण्यात आलेले. त्यामागे केवळ त्याच्याबद्दल प्रेम, मानसिकदृष्ट्या त्याला बरं वाटावं हाच उद्देश होता. याच कारणामुळे आम्ही कधीही उघडपणे याबद्दल कोणाशी चर्चा केली नाही.”

दरम्यान, फैजल खानच्या अभिनय क्षेत्रातील कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं, ‘मेला’, ‘जो जिता वही सिकंदर’, ‘मधोश’, ‘चाँद बुझ गया’, ‘फॅक्ट्री’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे. यामधील ‘मेला’ व ‘जो जिता वही सिकंदर’ चित्रपटांत त्यानं त्याचा भाऊ आमिरसह काम केलं होतं.