Nana Patekars unmissable movies: नाना पाटेकर असे अभिनेते आहेत, ज्यांनी फक्त मराठीत काम केले असे नाही. तर त्यांनी हिंदीतही उत्तम सिनेमांमध्ये काम केले. त्यांच्या अनेक भूमिका, डायलॉग गाजले. त्यामुळे आज त्यांचा फक्त महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशभरात त्यांचा चाहतावर्ग आहे.

नाना पाटेकर आजही वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना दिसतात. नुकतेच ते हाऊसफुल ५ या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे प्रेक्षकांकडून कौतुक होताना दिसले. आता तुम्हाला त्यांचे काही चित्रपट पाहायचे असतील जे ओटीटीवर उपलब्ध आहेत. तर ते कोणते आहेत आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत, त्याविषयी जाणून घेऊयात.

१. सलाम बॉम्बे

ही कथा कृष्णा नावाच्या एका लहान मुलाची आहे, ज्याला त्याच्या कुटुंबाने सोडून दिले आहे आणि मुंबईच्या रस्त्यावर जगण्यास भाग पाडले जाते. नाना पाटेकर यांनी बाबा नावाच्या स्थानिक ड्रग्ज विक्रेत्या आणि दलालाची भूमिका केली आहे. १९८८ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्राइम व्हिडीओ व जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट उपलब्ध आहे.

२. खामोशी: द म्युझिकल

‘खामोशी: द म्युझिकल’ हा चित्रपट १९९६ साली प्रदर्शित झाला होता. सलमान खानदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होता. या चित्रपटात नाना पाटेकर यांनी मनीषा कोइरालाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. जोसेफ असे त्यांच्या पात्राचे नाव होते. सध्या हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर उपलब्ध आहे. तसेच युट्यूबवरदेखील हा चित्रपट उपलब्ध आहे.

३. अब तक छप्पन

नाना पाटेकर यांनी साधू आगाशे या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारांना पकडण्यासाठी या पोलिस अधिकाऱ्याची ख्याती आहे. हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अमेझॉन प्राइम, सोनी लिव्ह व युट्यूबवर उपलब्ध आहे.

४. वेलकम

वेलकम हा कॉमेडी चित्रपट आहे. २००७ साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात नाना पाटेकर यांच्यासह अक्षय कुमार, अनिल कपूर, कतरिना कैफ हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचा आजही चाहतावर्ग आहे.हा चित्रपट सध्या एमएक्स प्लेअर, जिओ हॉटस्टारवर उपलब्ध आहेत.

५. तिरंगा

नाना पाटेकर यांनी शिवाजीराव वागळे या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली होती. १९९२ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. झी ५ वर सध्या हा चित्रपट उपलब्ध आहे.

६. राजू बन गया जेंटलमन

१९९२ साली प्रदर्शित झालेल्या रोमँटिक चित्रपटात शाहरुख खान व जुही चावला प्रमुख भूमिकेत दिसले होते.यामध्ये नाना पाटेकरदेखील प्रमुख भूमिकेत होते. जिओ हॉटस्टार, एमएक्स प्लेअरवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.