Abhishek Bachchan Shared Emotional Post : अभिनेता अभिषेक बच्चनने त्याच्या मेकअप आर्टिस्ट अशोक सावंत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. रविवारी (९ नोव्हेंबर) अशोक सावंत यांचे निधन झाले. अभिषेकने त्यांच्या जुन्या फोटोंसह एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्याने त्याचा मेकअप आर्टिस्ट त्याला कुटुंबाप्रमाणेच होता असं सांगितलं आहे.

अभिषेक बच्चनने इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्याने त्यांच्याबरोबरच्या आठवणीसुद्धा सांगितल्या आहेत. अभिषेक बच्चन पोस्ट शेअर करत म्हणाला, “अशोक दादा व मी गेली २७ वर्ष एकत्र काम केलं. माझ्या पहिल्या चित्रपटापासून ते माझा मेकअप करत आहेत. ते फक्त माझ्या टीमचा भाग नव्हते तर मला माझ्या कुटुंबाप्रमाणे होते. त्यांचे मोठे भाऊ दीपक माझ्या वडिलांचा जवळपास ५० वर्ष मेकअप करत आले आहेत.”

अभिषेक बच्चनने दिला जुन्या आठवणींना उजाळा

अभिषेक पुढे म्हणाला, “गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते, त्यामुळे ते बऱ्याचदा माझ्याबरोबर सेटवर नसायचे. पण, जेव्हा मी शूटिंग करायचो तेव्हा असा एकही दिवस गेला नाही की त्यांनी माझी काळजी घेतली नाही. ते नेहमी त्यांचा असिस्टंट माझा मेकअप नीट करत आहे ना याची काळजी घ्यायचे. ते खूप प्रेमळ होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचं. कायम त्यांच्याकडे भाकरवडी आणि चिवडा असायचा.”

अभिषेक त्याचा मेकअप आर्टिस्ट अशोक सावंतबद्दल म्हणाला, “काल रात्री आम्ही त्यांना गमावलं. जेव्हा केव्हा मी माझ्या नवीन चित्रपटाचा पहिला सीन करायचो तेव्हा मी नेहमी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचो. धन्यवाद दादा, तुझ्या प्रेमासाठी, काळजीसाठी, कलेसाठी आणि हास्यासाठी. तुम्ही नसताना कामावर जाणं ही कल्पनाच करवत नाहीये.”

दरम्यान, अभिषेक बच्चन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. यामार्फत तो त्याच्या कामासंदर्भातील पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो.