दिग्गज अभिनेत्री मुमताज यांनी युगांडा येथील उद्योगपती मयूर माधवानीशी लग्न केल्यानंतर चित्रपटसृष्टी सोडली होती. त्या लग्न करून पतीबरोबर युगांडामध्ये स्थायिक झाल्या होत्या. लग्न केलं तेव्हा त्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर होत्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक होत्या. कोट्याधीश मयुर माधवानीशी लग्न करण्यासाठी करिअर सोडायला कुटुंबाने सांगितलं होतं, असं मुमताज यांनी सांगितलं.

मयुर माधवानी यांच्या कुटुंबाची इच्छा होती की मुमताज यांनी चित्रपटांमध्ये काम करू नये आणि संसार करावा. मुमताज यांनी अवघ्या २८ व्या वर्षी इंडस्ट्री सोडली. मयुर माधवानी यांच्याशी लग्न करून मुमताज पारंपरिक गुजराती कुटुंबात गेल्या.

पतीसाठी लग्नात बऱ्याच तडजोडी केल्या, असं मुमताज सांगतात. मुमताज अनेक गुजराती पदार्थ बनवायला शिकल्या होत्या. मुमताज यांनी लग्न करण्यासाठी करिअर सोडलं, पण पतीचे अफेअर समजल्यावर खूप दुःख झाले होते, असं मुमताज म्हणाल्या होत्या.

मुमताज यांच्या पतीचे अफेअर

मुमताज यांच्या वैवाहिक आयुष्यात सर्व सुरळीत नव्हतं. त्यांच्या पतीच्या आयुष्यात दुसरी महिला आली आणि या दोघांच्या नात्यात दुरावा आला. मुमताज यांनी पतीच्या अफेअरची गोष्ट मान्य केली. पण तरीही पतीला सोडलं नाही, याबद्दल बोलताना त्यांनी पतीची बाजू घेतली. “फक्त एका चुकीच्या घटनेमुळे मी लग्न मोडणार नव्हते. माझा नवरा खूप देखणा आहे. त्याने चूक केली. त्याला सोडून देण्याऐवजी, मी त्याच्याबरोबर राहणं पसंत केलं,” असं मुमताज म्हणाल्या.

पिंकव्हिलाला दिलेल्या एका मुलाखतीत “पुरुषांचे छुपे प्रेमसंबंध असणं सामान्य गोष्ट आहे. माझ्या पतीचे फक्त एकच अफेअर होते,” असं मुमताज म्हणाल्या. मुमताज यांचे पती मयुर माधवानी यांनी अमेरिकेतील एका मुलीवर प्रेम असल्याची कबुली दिली होती. तसेच तिच्यासाठी मुमताजला न सोडण्याचं वचन दिलं होतं. “तो माझ्याशी प्रामाणिक राहिला, याबद्दल मी त्याचा आदर करते,” असं मुमताज पतीबद्दल म्हणाल्या.

मुमताज यांचं अफेअर

पतीच्या अफेअरमुळे दुखावलेल्या मुमताज भारतात परत आल्या आणि त्यांनीही अफेअर केलं होतं. “त्या प्रसंगानंतर मला खूप एकटं वाटू लागलं. मी थोडी अहंकारी होते, त्यामुळे मी प्रचंड दुखावले गेले होते. मी भारतात परत आले. जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत असता तेव्हा कोणीच्या तरी चांगल्या वागण्याने वाहवत जाता, तसंच माझ्याही बाबतीत घडलं. माझं नातं फार गंभीर नव्हतं आणि ते फार काळ टिकलंही नव्हतं,” असं मुमताज स्वतःच्या अफेअरबद्दल म्हणाल्या.

मुमताज यांनी १९९० मध्ये रिलीज झालेल्या ‘आंधियां’मधून सिनेसृष्टीत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि त्या पुन्हा कधीही मोठ्या पडद्यावर परतल्या नाहीत.