फिल्म इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नसताना अनेक कलाकारांनी नाव कमावलं. अशाच एका अभिनेत्रीने ९० च्या दशकात मॉडेलिंग व जाहिराती करून प्रचंड यश मिळवलं. नंतर ती चित्रपटांमध्ये आली. तिने काही सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
करियरमध्ये यशाच्या शिखरावर असताना अनिल कपूरच्या या हिरोईनने लग्न केलं. लग्नानंतर ती अभिनय सोडून संसारात रमली. पण तिचं लग्न फार काळ टिकलं नाही. या अभिनेत्रीचं नाव पूजा बत्रा.
अनिल कपूरच्या ‘नायक’ चित्रपटात रिपोर्टरच्या भूमिकेत दिसेली पूजा बत्रा खूपच सुंदर दिसते. पूजाचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी होते, तर तिची आई मॉडेल होती. खूप कमी वयात मॉडेलिंग क्षेत्रात आलेली पूजा व्यावसायिक आयुष्यात यशस्वी ठरली, पण वैयक्तिक आयुष्यात मात्र खूप चढ-उतार आले.
पूजा बत्राने जाहिराती व मॉडेलिंगमध्ये मिळवलं यश
पूजा बत्रा १९९३ मध्ये, अवघ्या १८ व्या वर्षी फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल ठरली होती. तर मिस एशिया पॅसिफिकमध्ये तिसरी उपविजेती राहिली होती. मॉडेलिंगमध्ये यश मिळवल्यानंतर पूजाला भारतात हेड अँड शोल्डर्स शॅम्पूमुळे लोकप्रियता मिळाली. एक मॉडेल म्हणून तिने २५० पेक्षा जास्त जाहिराती व मॉडेलिंग शो केले. पुढे ती लिरिल साबणाच्या जाहिरातीचा मुख्य चेहरा झाली. मॉडेलिंगमध्ये यशस्वी झाल्यावर ती अभिनयाकडे वळली. तिने १९९७ मध्ये पहिला चित्रपट केला. ‘विरासत’ तिच्या चित्रपटाचं नाव. या चित्रपटात अनिल कपूर होते.
विरासतचे बजेट व कलेक्शन
विरासत सिनेमा फक्त ५ कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास २० कोटी रुपये कमाई केली होती. त्यानंतर पूजाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ‘चंद्रलेखा’, ‘आई हसीना मान जायेगी’, मल्याळम चित्रपट ‘मेघम’, ‘नायक’ आणि ‘तलाश’ हे तिचे गाजलेले चित्रपट होय.
पूजा बत्राचं लग्न, घटस्फोट अन् दुसरं लग्न
पूजा बत्राचं फिल्मी करिअर खूप चांगलं राहिलं, पण तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तिच्या करिअरला फटका बसला. २००३ मध्ये तिने अमेरिकेतील सर्जन डॉ. सोनू एस. अहलुवालिया यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर, अभिनेत्री चित्रपटांपासून दूर गेली, पण तिलं लग्न फार काळ टिकलं नाही. २०११ मध्ये पूजा बत्राचा घटस्फोट झाला. त्यानंतर ८ वर्षांनी पूजाने दुसरं लग्न केलं.
पूजा बत्राने ४२ व्या वर्षी २०१९ मध्ये बॉलीवूड अभिनेता नवाब शाहबरोबर दुसरं लग्न केलं. नवाब शाह तिच्यापेक्षा ४ वर्षांनी मोठा आहे. पूजा व नवाब एकत्र खूप आनंदी आहेत आणि सुखाचा संसार करत आहेत.
