‘आदिपुरुष’ हा बॉलिवूड चित्रपट टीझरपासूनच चर्चेत आहे. १६ जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. परंतु, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. रामायणावर आधारित असलेल्या ‘आदिपुरुष’वर प्रेक्षक टीका करत आहे. असं असुनही आदिपुरुषचे शो हाऊसफूल होत आहेत.
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत असून त्याने राघव हे पात्र साकारलं आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन सीता माता म्हणजेच जानकीच्या भूमिकेत आहे. या चित्रपटातील क्रितीच्या अभिनयाचं कौतुक होताना दिसत आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली क्रिती या सिनेमातील जानकी पात्रासाठी पहिली निवड नव्हती. क्रिती आधी दोन दाक्षिणात्य अभिनेत्रींना या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं.
मीडिया रिपोर्टनुसार, दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेशची ‘आदिपुरुष’साठी निवड करण्यात आली होती. किर्तीनेही चित्रपटासाठी होकार दिला होता. परंतु, सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबरच्या चित्रपटामुळे तिने ‘आदिपुरुष’ला नकार दिला. त्यानंतर बाहुबली फेम अनुष्का शेट्टीला जानकीच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र तिने ही भूमिका साकारण्यास नकार दिला. या भूमिकेसाठी अनुष्का शर्मा व कियारा अडवाणी यांच्या नावाचीही चर्चा होती. अखेर क्रिती सेनॉनची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली.
‘आदिपुरुष’ हा बॉलिवूडमधील बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. ५०० कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी देशभरात तब्बल ९५-९८ कोटींचा गल्ला जमवत विक्रमी कमाई केली. तर जगभरात या चित्रपटाने १४० कोटींची कमाई केली आहे.