Aishwarya Rai Bachchan Royal Look At Cannes 2025 : ती आली अन् तिने जिंकून घेतलं…’कान्स’च्या रेड कार्पेटवर सगळेजण ज्या अभिनेत्रीची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते, जिच्या रॉयल लूकची सध्या सर्वत्र चर्चा रंगलीये…अशी बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच ऐश्वर्या राय बच्चन!

२००२ मध्ये ऐश्वर्या रायने ‘कान्स’ महोत्सवाच्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं होतं. यंदा या महोत्सवाला उपस्थित राहण्याचं ऐश्वर्याचं २२ वं वर्ष आहे. अभिनेत्री तिची १३ वर्षांची लेक आराध्यसह या कार्यक्रमाला पोहोचली होती.

ऐश्वर्याचं एअरपोर्टवर जंगी स्वागत करण्यात आलं होतं. यानंतर अभिनेत्री रेड कार्पेटवर नेमका कोणता लूक करणार याची चर्चा सर्वत्र रंगली होती. अखेर ऐश्वर्याची रॉयल एन्ट्री पाहून सगळेजण थक्क झाले आहेत. रेड कार्पेटवर एन्ट्री घेताच तिने सर्वात आधी हात जोडून सर्वांना अभिवादन केल्याचं पाहायला मिळालं.

‘कान्स’च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याचा देसी अंदाज पाहायला मिळाला. आयव्हरी रंगाची डिझायनर साडी अन् त्याला बाजूने सोनेरी काठ, गळ्यात लाल रंगाचा नेकलेस, पारंपरिक दागिने, हातात मॅचिंग अंगठी, भांगेत कुंकू अशा पारंपरिक लूकमध्ये ऐश्वर्या कान्स महोत्सवाला पोहोचली होती. यावेळी अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. ‘फिल्मफेअर’ने “Queen Is Back” असं कॅप्शन देत ऐश्वर्याचे कान्सच्या रेड कार्पेटवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नेटकऱ्यांनी या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “खरी क्वीन”, “ऐश्वर्या व्हॉट अ लूक, खरंच सुंदर दिसतेय”, “ऐश्वर्याचा हा लूक सर्वात जास्त आणि सर्वांपेक्षा सुंदर आहे”, “सिंदूरने ऐश्वर्याच्या लूकची शोभा वाढवलीये”, “कान्सची खरी क्वीन” अशा प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या चाहत्यांनी या फोटोंवर दिल्या आहेत.

दरम्यान, २००२ मध्ये ‘देवदास’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी ऐश्वर्या राय बच्चन पहिल्यांदाच ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झाली होती. यानंतर, दरवर्षी ती एका नामांकित ब्रँडसाठी या चित्रपट महोत्सवात सहभागी होते. कार्यक्रमात ऐश्वर्याचा लूक काय असणार हा दरवर्षी चर्चेत विषय असतो. अभिनेत्रीचा यंदाचा हा रॉयल लूक सर्वांच्या पसंतीस उतरला आहे.