Mahesh Bhatt Praises Akshay Kumar : अक्षय कुमार बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. अभिनयाचा कोणताही वारसा नसताना त्यानं बॉलीवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली. आजवर त्यानं अनेक दिग्गज मंडळींबरोबर काम केलं आहे. अशातच आता लोकप्रिय दिग्दर्शक महेश भट्ट यांनी त्याच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे.
अक्षय कुमारनं ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी महेश भट्ट यांचा एक व्हिडीओ त्या भागात दाखवण्यात आला, ज्यामध्ये त्यांनी अक्षय कुमारबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी त्याचं कौतुक करीत हॉलीवूड अभिनेता टॉम क्रुजबरोबर त्याची तुलना केली आहे. त्यांनी अक्षय कुमारचा ‘अंगारे’ चित्रपटातील स्टंट करतानाचा एक किस्सा सांगितला आहे.
महेश भट्ट यांनी केलं अक्षय कुमारचं कौतुक
अक्षय कुमारबद्दल महेश भट्ट म्हणाले, “जर हॉलीवूडकडे टॉम क्रुज आहे, जो स्वत:चे स्टंट स्वत: करतो; तर आपल्याकडे अक्षय कुमार आहे. मी स्वत: त्याला डेअरिंग स्टंट करताना पाहिलं आहे, जो पाहून तुम्हालाही भीती वाटेल. मी तो स्टंट पाहिला नाही. कारण- तेव्हा मीच डोळे बंद करून एका कोपऱ्यात निघून गेलो होतो.”
महेश भट्ट पुढे म्हणाले, “तो स्टंट खूप कठीण होता. मला फाइट मास्टरने असं सांगितलेलं की, जर नायकाने बिल्डिंगवरून उडी मारली, तर तो स्टंट दिसताना अजून चांगला दिसेल. मी म्हटलं की, हे जीवावर बेतू शकतं. पण अक्षय म्हणालेला की, घाबरू नका मी करेन. मी त्याला म्हटलं की, अक्षय, हे बघ तू माझी जबाबदारी आहेस. जर काही चुकीचं घडलं, तर मी काय करायचं? तेव्हा त्यानं माझी काहीही चुकीचं घडणार नाही म्हणत याबद्दल समजूत काढली होती.”
अक्षय कुमार तो स्टंट करीत असताना महेश भट्ट यांना इतकी भीती वाटलेली की, त्यांनी तो सीन शूट होत असताना त्यांचे डोळे बंद केले होते. त्याबद्दल ते म्हणाले, “मी माझे डोळे बंद केले आणि मागे निघून गेलो, त्यानंतर तिथे खूप शांतता झाली होती; पण नंतर जेव्हा लोकांच्या टाळ्या वाजवण्याचा आवाज आला तेव्हा मी सुटकेचा श्वास घेतला आणि अक्षय कुमार ठीक आहे का बघण्यासाठी तिथे गेलो. त्याचे हावभाव असे होते जणू काही झालंच नाहीये. मला असं वाटतं की, यामुळेच तो आज करिअरमध्ये इतका पुढे आला आहे.”
अक्षयला जेव्हा तुला त्यावेळी दिग्दर्शकाबद्दल काळजी वाटली का, असं विचारलं तेव्हा त्याने “मी स्वत:ला आधी स्टंटमन समजतो आणि मग अभिनेता. मी त्या सगळ्या फाईट मास्टर्सना श्रेय देऊ इच्छितो, जे कलाकार व स्टंटमनची काळजी घेतात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं, तर दिग्दर्शकाला हवा तसा शॉट देणं ही खूप कमाल भावना आहे. समाधानकारक आहे.” अक्षय कुमार एक मार्शल आर्टिस्ट असून, त्यान त्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. आजवरच्या त्याच्या करिअरमध्ये त्यानं असे अनेक स्टंट केले आहेत, जे करणं फार कठीण समजलं जातं.