Akshay Kumar on son Aarav: अभिनेता अक्षय कुमार नुकताच ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अर्शद वारसी, अमृता राव महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. खळखळून हसवणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे पाहायला मिळाले.
अभिनेता आता त्याच्या चित्रपटामुळे किंवा त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत नाही, तर त्याने त्याच्या मुलाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमार हा त्याच्या फिटनेस आणि शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी लोकप्रिय आहे. आता त्याच्या मुलांना शिस्त लावण्यात त्याचा किती वाटा आहे, त्याचे मुलांबरोबर कसे बॉण्डिंग आहे याबद्दल अभिनेत्याने वक्तव्य केले.
अक्षय कुमार म्हणाला…
अक्षय कुमारने नुकतीच एबीपी न्यूजशी संवाद साधला. तो म्हणाला, “मी खूप कडक शिस्तीचा नाही, शिस्त लावण्याची संपूर्ण जबाबदारी माझ्या पत्नीची आहे, ती खूप गंभीर आहे; ती मला, नितारा आणि आरव तिघांना शिस्तीत ठेवते.”
“मी माझ्या मुलाचा मित्र आहे. तो २३ वर्षांचा आहे. तो लवकर मोठा झाला. तो सध्या शिक्षण घेत आहे आणि अभ्यास करण्यात व्यग्र आहे. त्याला कोणत्याही वाईट सवयी नाहीत. तो ट्विंकलसारखा आहे, कारण ट्विंकलसुद्धा सतत अभ्यास करत असते.”
भविष्यात त्याचा मुलगा चित्रपटसृष्टीत येईल का? त्यावर अक्षय म्हणाला, “त्याला मनोरंजनसृष्टीत करिअर करायचे नाही. त्याने मला स्पष्ट सांगितले आहे की मला या क्षेत्रात यायचे नाही. मी त्याला माझ्या प्रोडक्शन कंपनीत काम करण्यासाठीसुद्धा सुचवले, पण त्याला ते करायचे नाही. त्याला फॅशन क्षेत्रात काम करायचे आहे. त्याला डिझायनर बनायचे आहे. सध्या तो फॅशन क्षेत्रातील शिक्षण पूर्ण करत आहे. तो त्याच्या आयुष्यात आनंदी आहे, पण मीसुद्धा त्याच्या निर्णयाने आनंदी आहे.”
अक्षयने आरवच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्यासाठी एक पत्र लिहिले होते. त्याबद्दल अभिनेता म्हणाला, “तुझे वडील चित्रपटात अनेक सीनमध्ये पळत असतात. मी शूटिंगदरम्यानसुद्धा खूप पळत असतो, पण या सगळ्यात संयम महत्त्वाचा आहे. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट काही क्षणात घडत नाही, तुला प्रत्येक गोष्ट पटकन मिळणार नाही.”
अक्षयच्या मुलाबद्दल बोलायचे तर तो वयाच्या १५ व्या वर्षी शिक्षणासाठी लंडनला गेला आहे. तो प्रसिद्धीझोतापासून कायमच दूर राहत असल्याचे दिसते. सध्या तो लंडनमध्ये फॅशन डिझाइनमध्ये कोर्स पूर्ण करत आहे.