Famous Music Composer appreciates Arjit Singh : अरिजित सिंह हा बॉलीवूडमधील लोकप्रिय गायक आहे. आजवर त्याने असंख्य गाणी गात त्याच्या चाहत्यांच्या मनात जणू कायमचं घर केलं आहे. प्रत्येक वयोगटातील लोक त्याची गाणी ऐकताना दिसतात. तर देशाबाहेरसुद्धा त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहते त्याच्या कॉन्सर्टला लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. प्रेक्षकांसह अनेक कलाकारांचाही तो आवडता गायक आहे.

अनेकदा काही कलाकारांनी मुलखतींमार्फत त्याचं कौतुक केलं आहे. अशातच आता संगीतकार अमाल मलिकनं अरिजित सिंहचं भरभरून कौतुक केलं आहे. अरिजित व अमाल या दोघांनी अनेक गाण्यांच्या निमित्तानं एकत्र काम केलं आहे. अरिजित व अमाल यांनी ‘सूरज डुबा हैं’, ‘सोच ना सके’, ‘रोके ना रुके नैंना’ यांसारख्या गाण्यांसाठी एकत्र काम केलं आहे. तर अमाल मलिकच्या मते, अरिजित सिंह हा भारतातील सर्वोत्तम गायक आहे.

अमाल मलिकने नुकतंच ‘मिर्ची प्लस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरिजितचं कौतुक केलं आहे. अरिजितबद्दल संगीतकार म्हणाला, “अरिजित हा माणूस म्हणून खूप चांगला आहे. तो कधीही कोणाकडून त्याचं काम हिसकावून घेत नाही. तसेच इतरांशी कधीच स्वत:ची तुलना करीत नाही. अरिजित कधीच दिखावा करत नाही. तो भारतातील प्रसिद्ध गायक आहे”.

अमालने पुढे अरिजितने गायलेल्या गाण्यांबद्दलही सांगितलं आहे. तो म्हणाला, “अरिजितने ‘बिंते दिल’, ‘सुरज डुबा हैं’, ‘तेरा हिरो इधर हैं’, ‘दुआ’, ‘तुम ही हों’, ‘जमाना लगे’ यांसारखी वैविध्यपूर्ण गाणी गायली आहेत. आपल्याकडे इतर काही चांगले गायकसुद्धा आहेत; पण अरिजितने जी गाणी गायली आहेत, ती मला नाही वाटत की, तसं इतर कोणीही इतक्या चांगल्या पद्धतीनं गायली असती”.

अमाल पुढे अरिजितबद्दल मुलाखतीमध्ये म्हणाला, “म्युझिक इंडस्ट्रीमध्ये असे अनेक लोक आहेत, जे त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण ज्याला स्वत: देवाचा पाठिंबा आहे, ज्याच्याकडे त्याच्या कुटुंबीयांचे आशिर्वाद आहेत, त्याचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही”. पुढे अमाल म्हणाला, गाण्याच्या निमित्तानं अरिजितसह काम करताना त्याच्याकडून शांतपणे काम कसं करावं हे शिकायला मिळाल्याचं सांगितलं आहे.

अरिजितचं कौतुक करीत अमाल पुढे म्हणाला, “तो काही सिद्ध करण्याच्या मागे नसतो. आम्ही दोघेही आपण काय वेगळं करू शकतो यावर लक्ष केंद्रित करतो. जर तुम्ही त्याला १ कोटी रुपये जरी दिले तरी तो त्याचा स्वीकार करणार नाही, आणि म्हणेन की या गाण्याच्या जागी दुसरं चांगलं गाणं द्या मी ते गातो. पण अनेक गीतकारांना असं वाटतं की, अरिजित त्यांच्या चांगल्या गाण्यांच्या ऑफरना नकार देतो; पण त्याला कदाचित ती गाणी गायची नसतील. कारण- त्यानं आजवर अनेक गाणी गायली आहेत”.

अमला पुढे म्हणाला, “अरिजितनं आजवर वैविध्यपूर्ण गाणी गायली आहेत. त्यानं १० वर्षांत जवळपास विविध भाषांतील ८०० तरी गाणी गायली असतील. त्यामुळे कदाचित तो जास्त प्रवास करीत नसेल. जास्त शोज करीत नसेल, त्याला कदाचित त्याच्या मुलांना, बायकोला वेळ द्यावासा वाटत असेल”. अमाल पुढे इंडस्ट्रीतील लोकांबद्दल म्हणाला, “गेल्या चार-पाच वर्षांपासून अनेक म्युझिक कंपन्या व कलाकार मंडळी त्याच्या जागी इतर गायकांना संधी देत, त्याला रिप्लेस करण्याचा प्रयत्न करत आहेत”.