बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते रोज सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट करत असतात. काही वेळा ते एखाद्या विषयावर त्यांचं मत मांडतात, बरेचदा ते त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनचं कौतुक करत असतात. तसेच ते त्यांना आवडलेला, ट्रेलर किंवा टीझरही शेअर करत असतात. आता त्यांनी नुकत्याच केलेल्या पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी एका मराठी चित्रपटाचा ट्रेलर फेसबूकवर शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरची लिंक शेअर करून बिग बी यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

अमिताभ बच्चन यांनी फेसबूकवर ‘येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर फेसबूकवर शेअर करून टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बींनी मराठी सिनेमाचा ट्रेलर शेअर केला, याबद्दल चाहत्यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे. ‘तुम्ही मराठी चित्रपट प्रमोट करताय हे पाहून आनंद झाला. तुम्ही व्यक्ती म्हणून खूप चांगले आहात,’ अशी कमेंट एका युजरने केली. तर इतर काही जणांनी बिग बींच्या पोस्टवर कमेंट करून चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

पाहा पोस्ट –

अमिताभ बच्चन यांची पोस्ट (सौजन्य – फेसबुक)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच करण्यात आला. चित्रपटाचं गाणं आधीच प्रदर्शित झालं होतं, त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता ट्रेलरने त्या उत्सुकतेत आणखीनच भर घातली आहे.

ट्रेलरमध्ये ५ कोटी रुपये आणि सोन्याच्या बिस्किटांसाठी चाललेली धावपळ आणि गोंधळ पाहायला मिळतोय. सगळ्यांचेच लक्ष त्या पाच कोटी रुपयांवर असते, मात्र या ५ कोटी रुपयांचा खेळ कोण जिंकणार? हे प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. ‘येरे येरे पैसा ३’ हा चित्रपट १८ जुलैला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांसारख्या दमदार कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.