Amitabh Bachchan : आता आपण एखाद्याला फोन लावतो, तेव्हा सर्वात आधी बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजात एक उद्घोषणा ऐकू येते. अमिताभ यांच्या आवाजात आपल्याला सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक आणि सावधगिरी बाळगण्याचा सूचना दिली जाते.

सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांना सतर्क राहण्यासाठी ही माहिती असली, तरी काही लोकांना प्रत्येकवेळी फोन केल्यानंतर ऐकू येणाऱ्या अमिताभ यांचा आवाज ऐकून त्रास होत आहे आणि या त्रासाबद्दल नेटकऱ्यांनी थेट अमिताभ यांनाच सवाल केला आहे. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. सोशल मीडियावर स्वत:च्या अनेक पोस्ट करण्याबरोबरच ते चाहत्यांच्या प्रश्नांनाही उत्तरं देतात.

अशातच नुकतंच एका तरुणीने अमिताभ यांना मोबाईलवरील त्यांच्या आवाजात ऐकू येणाऱ्या उद्घोषणेबद्दल प्रश्न विचारला. ज्यावर अमिताभ यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे. खरंतर अमिताभ यांनी मुलगा अभिषेक बच्चनच्या ‘कालीधर लापता’ या नव्या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आणि या पोस्टरसह त्यांनी लेकासाठी “हो! मी पण त्याचा एक चाहता आहे” असं म्हटलं.

अमिताभ बच्चन यांची एक्सवरील पोस्ट

अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटवर एका तरुणीने त्यांना उद्घोषणेबद्दल “मग फोनवर बोलणं बंद करा” असं म्हटलं. या ट्विटवर अमिताभ यांनी त्यांच्या शैलीत “तुम्ही सरकारला सांगा, त्यांनी आम्हाला करायला सांगितलं, म्हणून आम्ही केलं” असं उत्तर दिलं आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने अमिताभ यांना त्यांच्या वाढत्या वयावरुन ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र अमिताभ बच्चन यांनी या नेटकऱ्याला मिश्कील उत्तर दिलं.

अमिताभ बच्चन एक्स पोस्ट स्क्रीनशॉट
अमिताभ बच्चन एक्स पोस्ट स्क्रीनशॉट

एका नेटकऱ्याने अमिताभ यांना “हा माणूस म्हातारा झाला आहे” अशी कमेंट केली. यावर अमिताभ बच्चन यांनी या ट्रोलरला “एक दिवस, देव न करो तो दिवस लवकरच येईल, जेव्हा तुम्हीही म्हातारे व्हाल” असं मिश्कील उत्तर दिलं. अमिताभ यांच्या या सोशल मीडियावरील पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

दरम्यान, अमिताभ यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते ‘वेट्टैयन’ या चित्रपटात दिसले होते. त्याआधी ते ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटात दिसले होते, ज्यामध्ये बाहुबली फेम प्रभास, दीपिका पदुकोण आणि कमल हासन सारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर आता ते आर. बाल्की यांच्या ‘द इंटर्न’ या चित्रपटात दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.