कोण, कधी, कसं कुणाच्या प्रेमात पडेल, हे सांगता येत नाही. कोणाची मित्र-मैत्रिणींच्या माध्यमातून भेट होते, काही सोशल मीडियावर भेटतात आणि प्रेमात पडतात. फिल्म इंडस्ट्रीत कलाकार एकत्र काम करताना प्रेमात पडल्याची अनेक उदाहरणं आहेत. पण एका बॉलीवूड अभिनेत्रीची लव्ह स्टोरी फारच हटके आहे. ती एका भटक्या कुत्र्यामुळे तिच्या होणाऱ्या पतीला भेटली. ही अभिनेत्री म्हणजे अॅनिमल सिनेमात रणबीर कपूरच्या आईची भूमिका करणारी चारू शंकर होय.
चारू शंकरचा जन्म दिल्लीतला. राजधानीतच ती लहानाची मोठी झाली. “दिल्ली माझ्यासाठी खूप लकी शहर आहे. माझे बालपण तिथे गेले. मी तिथेच शिकले, प्रेमात पडले, लग्न केले आणि तिथेच माझ्या करिअरला सुरुवात केली. मी अजूनही माझ्या कुटुंबासह दिल्लीत राहते. दिल्लीत मला मार्गदर्शन मिळाले. मी नेहमीच चित्रपटांपेक्षा कला आणि नाटकांची चाहती आहे. दिल्लीत कला आणि संस्कृतीसाठी अतिशय चांगले वातावरण आहे. मी अभिनयासाठी अनेकदा मुंबईला जाते, पण आमचे घर दिल्लीत आहे,” असं चारू शंकर म्हणाली.
चारू-राघवची फिल्मी लव्ह स्टोरी
“मी शिक्षण पूर्ण केल्यावर थिएटर करत होते. तेव्हा मी डान्स व अभिनयात बिझी होते. माझी दिनचर्या थकवणारी होती. मी इतकी व्यग्र होते की स्वतःबद्दल विचार करायला वेळच नव्हता. असं असलं तरी माझी लव्ह स्टोरी खूपच रंजक आहे. माझी व राघवची भेट डेटिंग अॅप, हॉटेल किंवा मित्राच्या घरी झाली नव्हती. एक मोकाट कुत्र्याला वाचवताना आमची पहिली भेट झाली होती,” असं चारू शंकरने सांगितलं.
…अन् चारू-राघवने केलं लग्न
“एके दिवशी, मी माझ्या गाडीने घरी परतत होते. वाटेत मला एक जखमी कुत्रा दिसला. मी कुत्र्याला मदत करण्यासाठी गाडीतून उतरले. कुत्र्याला वाचवताना माझी भेट राघवशी झाली. आम्हाला दोघांनाही प्राणी आवडतात. कुत्रा वाचला अन् आम्ही दोघे प्रेमात पडलो. नंतर आमच्या भेटीगाठी वाढल्या आणि आम्ही लग्न केलं,” असं चारू म्हणाली.
चारू शंकर सुरुवातीला फिटनेस शो करत होती. तिला हळुहळू काम मिळू लागलं. तिला ‘सियासत’ मालिका मिळाली. या मालिकेत तिने मेहरुनिसा ही भूमिका केली. ‘सियासत’च्या शूटिंगसाठी चारू दीड वर्ष मुंबईतील कांदिवली येथे राहिली. मुंबईतील तिच्या रुममेट्स खूप छान काश्मिरी जेवण बनवायच्या, त्यामुळे जेवणाबद्दल कधीच अडचण आली नाही. ‘सियासत’च्या आधीच चारूचं लग्न झालं होतं, त्यामुळे राघव तिला भेटायला मुंबईला यायचा.
हेही वाचा
आयुष्यात समाधानी आहे चारू
“मला ग्लॅमर इंडस्ट्री व थिएटर दोन्हीकडे काम मिळालं. मी नावही कमावलं. मला फिटनेसची आवड आहे. आता मी माझ्या आवडीचं काम करतेय. गरोदर महिलांच्या आरोग्यासाठी मी काम करते, यातून मला समाधान मिळतं. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास मला आवडणाऱ्या मुलाशी मी लग्न केलं. आमच्या लग्नाला १५ वर्षे झाली आहे. आम्हाला एक मुलगा आहे. मी माझ्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात समाधानाही आहे. मला आयुष्याबद्दल काहीच तक्रार नाही,” असं चारू शंकर म्हणाली.