Anshula Kapoor reflected on the divorce of her parents: चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी जेव्हा श्रीदेवी यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांचे आधीच लग्न झाले होते. त्यांना दोन मुले होती. श्रीदेवींबरोबर त्यांनी गुपचूप लग्नगाठ बांधली. मात्र, या सगळ्यामुळे त्यांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली.

बोनी कपूर यांनी जेव्हा पहिल्यांदा श्रीदेवींना लग्नाची मागणी घातली होती. तेव्हा श्रीदेवी यांनी त्यांना नकार दिला होता आणि त्यांचे लग्न झाले आहे, याची आठवण करून दिली होती. मात्र, १९९७ ला श्रीदेवी व बोनी कपूर यांनी लग्नगाठ बांधली. आता बोनी कपूर यांची मुलगी अंशुला कपूरने या लग्नामुळे तसेच बोनी कपूर यांनी तिच्या आईला घटस्फोट दिल्याने त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला, याबाबत वक्तव्य केले आहे.

माझ्या पालकांच्या घटस्फोटानंतर माझ्या वर्गातील मुलं…

आता अंशुला कपूरने एका मुलाखतीत आई-वडिलांच्या घटस्फोटाचा आणि वडिलांच्या दुसरे लग्न करण्याचा तिच्यावर काय परिणाम झाला, यावर वक्तव्य केले आहे. नयनदीप रक्षितला दिलेल्या मुलाखतीत अंशुला म्हणाली, “आमचे पालक ९० च्या दशकात वेगळे झाले होते. त्यावेळी बंदिस्त अर्थव्यवस्था होती. परंपरांची मुळे खोल रुतलेली होती.

आपली परंपरा सांगते की, आयुष्यभरासाठी एक लग्न, एक कुटंब असतं. त्यावेळी घटस्फोट घेणं ही सामान्य गोष्ट नव्हती. मुंबईसारख्या शहरांतदेखील लग्न झालेलं जोडपं वेगळं होणं ही खूप वेगळी गोष्ट होती. जेव्हा आमचे पालक वेगळे झाले, तेव्हा आजूबाजूच्या लोकांना हे लक्षात यायला वेळ लागला की, कोणाच्याही चारित्र्यात काहीही दोष नाही. कोणीही चुकीचे नाही.”

“मी पहिल्या इयत्तेत होते. त्यावेळी लोकांना आमच्या आयुष्यात काय चाललं आहे, हे जाणून घ्यायचं नव्हतं. पालक त्यांच्या मुलांना आमच्या घरी येऊ द्यायचे नाहीत. ९० च्या दशकात शाळा सुटल्यानंतर तुम्ही खेळण्यासाठी कोणाच्या तरी घरी गेला असाल? पण, माझ्या पालकांच्या घटस्फोटानंतर माझ्या वर्गातील मुलं आणि त्यांचे पालक यांचं माझ्याप्रतिचं वागणं बदललं. शाळेत असतानाचा तो काळ खूप भावनिक आणि गोंधळात टाकणारा होता.”

लहान असताना लोक आपल्याला त्यांच्यापासून दूर का करत आहेत, याबद्दल कळत नसतं. यापेक्षा घरी वडील नसणं हे जास्त गोंधळात टाकणारं होतं. कुटुंबातील अनेक गोष्टी बदलल्या होत्या. ही वस्तुस्थिती समजून घेण्यास वेळ गेला. माझी आई मला सर्व गोष्टी सांगायची. तिनं कोणतीही गोष्ट लपवून ठेवली नाही.

माझ्या वडिलांनी जी जोडीदार निवडली होती. त्यामुळे त्यांच्या लग्नाची, माझ्या आई-वडिलांच्या घटस्फोटाची माहिती सगळीकडे पोहोचली. जर ते दोघे इतके प्रसिद्ध नसते, तर परिस्थितीशी जमवून घेणं आमच्यासाठी सोपं झालं असतं.

बोनी कपूर व श्रीदेवी यांना जान्हवी व खुशी अशा दोन मुली आहेत. २०१८ मध्ये श्रीदेवींचे अकस्मात निधन झाले. त्यानंतर अंशुला व अर्जुन यांचे जान्हवी व खुशी यांच्याबरोबर उत्तम बॉण्डिंग आहे. अंशुला म्हणालेली की, या दुर्घटनेमुळे तिला दोन बहिणी मिळाल्या आहेत. त्या माझ्या आयुष्यात आहेत, याबद्दल मी कृतज्ञ आहे. असे फिल्मफेअरला दिलेल्या जुन्या मुलाखतीत अंशुला म्हणाली होती.