दिवंगत अभिनेते इरफान खान यांनी त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने अनेकांच्या मनावर छाप सोडली. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. केवळ प्रेक्षकच नाही तर अनेक कलाकार मंडळीही यासाठी त्यांचं कौतुक करताना दिसतात. आज ते हयात नसले तरी प्रेक्षक त्यांना विसरलेले नाहीत. त्यांच्या कामाचं आजही तितकंच कौतुक होतं. इंडस्ट्रीतील काही कलाकारदेखील ते नसल्याची खंत व्यक्त करत असतात. त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे कलाकार म्हणून चार गोष्टी शिकायला मिळणार असा कलाकारांचा समज असायचा.

अशातच बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बसू यांनी नुकताच इरफान खान यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. लवकरच अनुराग बसू यांचा ‘मेट्रो इन दिनो’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर नुकतंच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. यानिमित्त मुंबईत एक मोठा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी चित्रपटातील कलाकारांनी दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यादरम्यान अनुराग बसू म्हणाले, “कोंकणा सेन शर्मा इरफान खान यांच्या आठवणीत रडली होती.” कोंकणा पुढे याबद्दल बोलताना म्हणाली, “‘जमाने लगेंगे उनको भुलाने में’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना मला अनेकदा इरफान खान यांची आठवण व्हायची. अनेकदा त्यांची कमी जाणवायची. पण, मी तुम्हाला सांगणार नाही की का आणि कसं झालं; कारण मी जे बोलतेय ते तुम्हाला चित्रपट पाहताना जाणवेल.”

यानंतर अनुराग बसू पुढे म्हणाले, “चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आम्ही बऱ्याचदा त्याची आठवण काढली. एकदा एका सीनसाठी कोंकणा व आम्ही शूट करत होतो, तेव्हा सीनच्या मध्ये तिने माझ्याकडे पाहिलं आणि ती रडायलाच लागली. आम्हाला नेहमी इरफान व के. के. (दिवंगत गायक किशोर कुमार) यांची आठवण येत असते. आमच्याव्यतिरिक्त टीममधील अशी बरीच माणसं आहेत, ज्यांना त्यांची आठवण येते.” इरफान खान व कोंकणा सेन शर्मा यांनी यापूर्वी अनेक कलाकृतींमधून एकत्र काम केलं आहे.

दरम्यान, ‘मेट्रो इन दिनो’ हा चित्रपट ४ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, अनुपम खेर, फातिमा सना शेख यांसारखे अनेक कलाकार झळकणार आहेत.