Aaliyah Kashyap American Wedding Wedding : बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची लाडकी लेक आलिया कश्यप हिने पुन्हा लग्न केलं आहे. आलिया पती शेन ग्रेगायरेबरोबर ख्रिश्चन पद्धतीने अमेरिकेत लग्न बंधनात अडकली. लग्नात तिने सासूबाईंचा ३० वर्षे जुना ड्रेस घातला. डिसेंबर २०२४ मध्ये मुंबईत पारंपरिक पद्धतीने लग्न करणाऱ्या आलियाच्या ख्रिश्चन पद्धतीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

आलिया कश्यपने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ऑफ शोल्डर व्हाइट गाऊनमध्ये आलिया सुंदर दिसतेय. आलियाने फोटोंमध्ये तिची साखरपुड्याची अंगठी देखील फ्लाँट केली. लग्नात आलियाचा पती शेन देखील खूप छान दिसत होता. दोघांनी किस करतानाचे, हातात हात घेऊन गार्डनमध्ये चालतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.

आलिया कश्यपची पोस्ट

२४ वर्षांच्या आलियाने कॅप्शनमध्ये लिहिलं, “मी माझ्या अमेरिकन लग्नात माझ्या सासूबाईंचा ३० वर्षे जुना लग्नातील ड्रेस परिधान केला. हा क्षण खूप खास होता.” आम्ही पुन्हा लग्न केलंय,” असं तिने एका पोस्टला कॅप्शन दिलंय.

आलिया कश्यपच्या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. खुशी कपूर, ओरी यांनीही आलियाच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.

आलिया व शेन यांचं मुंबईतील लग्न

आलिया व शेन यांचं लग्न ११ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईत हिंदू पारंपरिक पद्धतीनुसार पार पडलं. या लग्नात आलियाने पेस्टल गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता. तर, शेन याने क्रीम रंगाची शेरवानी घातली होती. या लग्नाला बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. लेकीच्या लग्नात अनुराग कश्यप भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

आलिया व शेन यांची पहिली भेट

आलिया ही लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व कंटेंट क्रिएटर आहे. तिची व शेन दोघांची पहिली भेट एका डेटिंग अॅपवर झाली होती. त्यानंतर ते डेट करू लागले. २०२३ मध्ये या दोघांनी साखरपुडा केला. शेन याने आलियाला बालीमध्ये प्रपोज केलं होतं. या जोडप्याने डिसेंबर २०२४ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघे हनिमूनसाठी मालदीवला गेले होते.