भारतीय फलंदाज विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी जगभरात लोकप्रिय आहे. या दोघांचे चाहते प्रेमाने त्यांना ‘विरुष्का’ म्हणतात. क्रिकेटसह मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं.

विराट-अनुष्काची पहिली भेट २०१३ मध्ये एका नामांकित कंपनीच्या जाहिरातीनिमित्त झाली होती. यानंतर काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ मध्ये इटलीत थाटामाटात लग्न केलं. ‘सब लेडी का कमाल’ म्हणत अनुष्कामुळे आयुष्यात खूप सकारात्मक बदल झाल्याचं विराटने अनेक मुलाखतींमध्ये मान्य केलं आहे.

मात्र, दोघांचंही क्षेत्र ( क्रिकेट-बॉलीवूड) वेगवेगळं असल्याने लग्न झाल्यावर पहिल्या सहा महिन्यांत विराट-अनुष्का केवळ २१ दिवस एकत्र होते. कामाच्या व्यग्र शेड्युलमुळे त्यांना एकमेकांना भेटणं शक्य व्हायचं नाही. अनुष्काने याबद्दल ‘वोग इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता.

अभिनेत्री म्हणाली होती, “मी जेव्हा विराटला भेटायला जाते, तेव्हा लोक गृहीत धरतात की कदाचित आम्ही सुट्ट्या एन्जॉय करतोय. पण, खरंतर असं कधीच होत नाही. लग्नानंतर पहिल्या सहा महिन्यांत आम्ही फक्त २१ दिवस एकत्र घालवले होते. मी त्यावेळी एक-एक दिवस मोजून ठेवला होता. कारण, अनेकदा क्रिकेट सामने परदेशात असायचे तेव्हा विराटला फक्त एक दिवस भेटता यावं यासाठी मी बाहेरगावी जायचे. आम्ही एकत्र जेवायचो, गप्पा मारायचो…ते क्षणही आमच्यासाठी खूप मौल्यवान असायचे.”

अनुष्कामुळे आयुष्य कसं बदललं याविषयी विराट म्हणतो, “अनुष्का आयुष्यात येण्यापूर्वी मी एवढा समजूतदार नव्हतो. तिच्याकडून मला भरपूर प्रेरणा मिळाली…उत्तम माणूस होणं गरजेचं आहे हे समजलं. अशी सुंदर व्यक्ती माझ्या आयुष्यात लाइफ पार्टनर म्हणून आहे हे माझं भाग्यच आहे.”

दरम्यान, विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर अनुष्काने देखील सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत पतीचं कौतुक केलं होतं. या दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर विराट-अनुष्काला दोन मुलं आहेत. त्यांची लेक वामिकाचा जन्म जानेवारी २०२१ मध्ये झाला. तर, २०२४ मध्ये विरुष्काला मुलगा झाला. त्यांच्या मुलाचं नाव अकाय असं आहे. आजवर विराट-अनुष्काने वामिका आणि अकायचा चेहरा सोशल मीडियावर रिव्हिल केलेला नाही. आपल्या मुलांनी बालवयात ग्लॅमरस आयुष्यापासून दूर राहावं अशी विराट-अनुष्का या दोघांचीही इच्छा आहे.