अर्जुन रामपालने २००१ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करून आज त्याने यशाचा एवढा मोठा पल्ला गाठला आहे. अर्जुनने त्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले असून बॉलीवूडच्या यशस्वी बड्या कलाकारांबरोबर त्याने स्क्रीन देखील शेअर केली आहे. परंतु, एक काळ असा होता जेव्हा त्याच्याकडे घराचं भाडं भरण्यासाठी पैसे नव्हते. नुकत्याच पॉप डायरीजला दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने आयुष्यातील संघर्षाच्या काळाबद्दल भाष्य केलं आहे.

बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अर्जुन रामपाल मॉडेलिंग करायचा. मॉडेलिंग थांबवल्यावर मधल्या काळात अभिनेत्याने अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. अभिनेता म्हणाला, “आयुष्यात ते संघर्षाचे दिवस आठवले की, प्रत्येकालाच त्रास होतो म्हणूनच अनेकजण त्या जुन्या आठवणी काढणं टाळतात. सेलिब्रिटींसाठी हा संघर्ष कायम सुरू राहतो. जोपर्यंत इंडस्ट्रीत तुम्ही स्वत:चं अढळ स्थान निर्माण करत नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला विचारत नाही. माझा संघर्ष एखाद्या दु:खद स्वप्नाप्रमाणे होता.”

हेही वाचा : “सर्व समस्या, अडचणी, आव्हानांचा…”, आईच्या वाढदिवशी सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला…

अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीला आलेल्या अडचणींबद्दल अर्जुन म्हणाला, “मी सुरुवातीला एक यशस्वी मॉडेल म्हणून काम करत होतो. त्याचवेळी अशोक मेहता माझ्याकडे ‘मोक्ष’ चित्रपटाची ऑफर घेऊन आले होते, त्या चित्रपटात मनीषा कोईराला माझ्याबरोबर स्क्रीन शेअर करणार होती. त्यावेळी ती यशाच्या शिखरावर होती. आम्ही चंबळ खोऱ्यात शूटिंग करत असताना अचानक तिच्याभोवती गर्दी जमा झाली होती. तेव्हा मला काही अंशी स्वत:चा तिरस्कार वाटू लागला. म्हणूनच पुन्हा कधी मॉडेलिंग करायचं नाही असं मी ठरवलं. पण, तो चित्रपट बनण्यासाठी सहा वर्षे लागतील याची मला जाणीव नव्हती.”

हेही वाचा : ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता-सौरभने गुपचूप उरकलेला साखरपुडा, पहिल्यांदाच शेअर केले फोटो अन् सांगितली तारीख

अर्जुन पुढे म्हणाला, “त्या काळात माझ्याकडे उत्पन्नाचं दुसरं कोणतंही साधन नव्हतं. तेव्हा मी सात बंगला परिसरात राहत होतो. माझे रुममालक एक सरदारजी होते. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी ते माझ्याकडे यायचे…मला बघायचे आणि बोलायचे ‘तुझ्याकडे पैसे नाहीत का?’ मी नकार दिल्यावर म्हणायचे, ‘काही हरकत नाही, मला खात्री आहे की, तू मला नक्की पैसे देशील” यानंतर अर्जुनने आणखी एक चित्रपट साइन केला आणि पुढे प्रदर्शनाच्यावेळी शोच्या प्रिमियला या सरदारजींना बोलावलं होतं.

“माझ्याकडे दोन कुत्रे होते, पैसे नसल्याने मी व्हेज ( शाकाहारी ) खायचो आणि माझे कुत्रे मांसाहारी पदार्थ खायचे. मला नेहमी वाटायचं अरे माझ्याबरोबरच असं का होतंय? पण, आयुष्यात असे अनुभव येणं खूप महत्त्वाचं असतं. कारण, यामुळे तुम्ही आयुष्यात कृतज्ञ राहणं शिकता.” असं अर्जुन रामपालने सांगितलं.