Ashok Saraf Talks About Shahrukh Khan And Salman khan : शाहरुख खान व सलमान खान यांनी एकत्र काम केलेला व प्रचंड गाजलेला चित्रपट म्हणजे ‘करण-अर्जुन’. या चित्रपटातील त्यांची जोडी हिट झाली होती. यामध्ये प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. यातही त्यांनी त्यांच्या विनोदीशैलीने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची संधी गमावली नाही. अशातच आता त्यांनी या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

लोकप्रिय दिग्दर्शक राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘करण अर्जुन’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३० वर्षे झाली आहेत. यामध्ये शाहरुख खान, सलमान खान, काजोल, अशोक सराफ हे कलाकार झळकले होते. त्याकाळी हा चित्रपट हिट ठरला होता. यातील संवाद आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. अशातच आता अशोक सराफ यांनी सलमान व शाहरुखबद्दल सांगितलं आहे.

‘रेडिओ नशाला’ दिलेल्या मुलाखतीमध्ये अशोक सराफ यांना “हे खरं आहे का की शाहरुख व सलमान राकेश रोशन यांच्या खोलीबाहेर फटाके वाजवायचे?” असा प्रश्न विचारण्यात आलेला. यावर अशोक सराफ म्हणाले, “हो हे खरं आहे, असं जेव्हा व्हायचं तेव्हा मी तिथे जायचो नाही. मी कोणाला त्रास देत नाही पण ते दोघे खूप मस्ती करायचे.”

अशोक सराफ पुढे म्हणाले, “जॉनी लिव्हरसुद्धा त्यांच्यामध्ये सामील होत असे. पण, मी मात्र त्यापासून लांब असायचो. मी त्यांच्याबरोबर असायचो पण मस्ती करायचो नाही.” यासह राकेश रोशन यांनीसुद्धा मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं होतं. ते म्हणालेले, “ते माझ्या खोलीबाहेर फटाके वाजवायचे. मी त्यांना विचारायचो की तुम्ही असं का करत आहात.”

यासह शाहरुख खाननेसुद्धा याबाबत एकदा सांगितलं होतं. तो म्हणालेला, “पिंकीजी मला खूप ओरडल्या होत्या, कारण आम्ही राकेश यांना त्रास द्यायचो. पण, माझ्या आणि सलमानमध्ये विचारलं तर सलमानच्या तुलनेत मी कमी त्रास द्यायचो. आम्ही लहान मुलांसारखे मस्ती करायचो.”