Rajeev Khandelwal Shared His Casting Couch Experience : चंदेरी दुनियेच्या झगमगाटामागील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कास्टिंग काऊच. मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा वाईट अनुभव आला आहे. आजवर अनेक अभिनेत्रींनी त्यांच्याबरोबर घडलेल्या कास्टिंग काऊचच्या घटनांबद्दल सांगितलं आहे. पण कास्टिंग काऊचसारख्या प्रकरणांचा सामना केवळ अभिनेत्रींनाच नाही, तर अनेक अभिनेत्यांनाही करावा लागला आहे.

अशातच अभिनेता राजीव खंडेलवाललाही कास्टिंग काऊचा सामना करावा लागला होता. झुमला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल प्रतिक्रिया दिली. त्याने तडजोड करण्यास नकार दिला आणि यामुळे त्याला ही ऑफरही गमवावी लागली. तसंच या मुलाखतीत त्याने इंडस्ट्रीबाहेरील लोकांना काम मिळवताना येणाऱ्या आव्हानांबद्दलही त्याचं मत व्यक्त केलं. याबद्दल राजीव म्हणतो, “जेव्हा हे घडले (मी कास्टिंग काउचला बळी पडलो), तेव्हा मी लगेच त्या व्यक्तीला म्हटलं की माफ करा. तुम्हाला ते माझ्याकडून मिळणार नाही.”

यापुढे तो म्हणाला, “मी विचार केला की, ही व्यक्ती माझं नशीब ठरवेल का? तर नाही. माझं नशीब मी स्वतः लिहिणार. माझ्या प्रवासात मला सोबत देण्यास कोणी नकार दिला; तर त्याचा अर्थ असा नाही की, मी आयुष्यात पुढे जाणारच नाही. माझं नशीब घडवण्याचा किंवा ते बिघडण्याचा अधिकार मी कुणालाही दिलेला नाही.” यानंतर अभिनेत्याला त्याच्या तत्त्वांशी कधी तडजोड करावी लागली आहे का? असं विचारण्यात आलं.

मी कधीही तडजोड करणार नाही : राजीव खंडेलवाल

याबद्दल राजीव म्हणाला, “मला माझ्या करिअरच्या सुरुवातीपासूनच हे माहित होतं की, मी कधीही कोणत्याही गोष्टीसाठी तडजोड करणार नाही. मला माझी प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे कमवायची आहे. तुम्ही कोण आहात? आणि तुम्ही तुमच्या तत्त्वांवर कसे ठाम राहता? याला फार महत्त्व आहे असं मला वाटतं.”

राजीव खंडेलवालच्या कामाबद्दल थोडक्यात

दरम्यान, राजीव खंडेलवाल ‘कहीं तो होगा’ या टीव्ही शोमधून प्रसिद्धीझोतात आला. २००८ मध्ये त्याने आमिर खानसह बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने ‘टेबल नंबर २१’ , ‘शैतान’ आणि ‘ब्लडी डॅडी’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतंच त्याने आदित्य सरपोतदारच्या जिओ हॉटस्टारवरील ‘द सीक्रेट ऑफ द शिलेदार्स’ या चित्रपटात काम केलं आहे.