Bollywood Actress Who Refused 600 Crore: ऐश्वर्या राय, राणी मुखर्जी व करीना कपूर या अभिनेत्री २००० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी होण्यासाठी स्पर्धा करीत होत्या. याचदरम्यान ज्या अभिनेत्रीचे चित्रपट गाजत होते, ती अभिनेत्री प्रीती झिंटा ही आहे.
प्रीती झिंटा त्यावेळी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री नव्हती. मात्र, त्यावेळी तिचे चित्रपट खूप गाजायचे. त्या काळात ती यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होती. मात्र, आणखी एका कारणामुळे प्रीती झिंटा चर्चेत आली होती. तिने अंडरवर्ल्डला विरोध करण्याचे धाडस दाखवले होते. तसेच ६०० कोटींची संपत्तीदेखील तिने नाकारली होती.
६०० कोटींची संपत्ती नाकारलेली…
चित्रपट निर्माते शानदार अमरोही हे प्रीती झिंटाला मुलगी मानत होते. २०११ मध्ये शानदार अमरोही यांनी जाहीर केले की, ते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची ६०० कोटींची संपत्ती त्यांच्या मुलांना देण्याऐवजी प्रीतीच्या नावावर करतील. पण, प्रीती झिंटाने ही ६०० कोटींची संपत्ती नाकारली. विशेष म्हणजे अमरोही यांच्या मृत्यूनंतर, प्रीतीने चित्रपट निर्मात्याला दिलेल्या दोन कोटी रुपयांसाठी त्यांच्या मुलांवर केस दाखल केली होती.
प्रीती झिंटाबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जाते. ती बाब म्हणजे २००१ मध्ये गँगस्टर छोटा शकीलला ‘चोरी चोरी चुपके चुपके’ चित्रपटात गुंतवणूक करण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली निर्माता भरत शाहला अटक करण्यात आली होती. चित्रपटातील इतर कलाकारांनी या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवले होते. मात्र, प्रीती झिंटाने न्यायालयात साक्ष दिली की, तिला अंडरवर्ल्डकडून फोन आले होते. अभिनेत्रीने असाही खुलासा केला होता की, तिला खंडणी म्हणून ५० लाख देण्यास सांगण्यात आले होते; परंतु तिने ती खंडणी देण्यास नकार दिला.
दरम्यान, प्रीती झिंटाने १९९७ मध्ये मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘दिल चाहता है’, ‘कोई मिल गया’, ‘कल हो ना हो’, ‘वीर जारा’ व ‘कभी अलविदा ना कहना’, अशा अनेक चित्रपटांत तिने काम केले आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर ती तिच्या आयुष्यातील काही खास फोटो शेअर करताना दिसते. आजही प्रीती झिंटा यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.