प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका तनिष्ठा चॅटर्जीवर काही दिवसांपुर्वी दु:खाचा डोंगर कोसळला. गेल्या वर्षी तिच्या वडिलांचं निधन झालं आणि या दु:खातून सावरत असतानाच तनिष्ठाला कर्करोगाचं निदान झालं आहे. तनिष्ठाला स्तनाचा कर्करोग झाला असून याबद्दल तिने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना तनिष्ठाने तिच्या स्तनाच्या कर्करोगाबद्दलची माहिती दिली.
तनिष्ठाला चार महिन्यांपूर्वी मेटास्टॅटिक (स्टेज IV) ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. याबद्दल कळताच तिला धक्का बसला. अभिनेत्री वडिलांना गमावल्याच्या वेदनेतून सावरत होती; अशातच तिला तिच्या कर्करोगाबद्दल कळलं. याबद्दल ती म्हणाली, “आयुष्यातील सर्व काही उध्वस्त झाले आहे. या अनुभवातून मी सर्वात मोठी शिकवण शिकली ती म्हणजे माणुसकी. लोक तुमची काळजी घेतात. तुम्हाला फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे.”
यापुढे तनिष्ठा म्हणाली, “गेल्या वर्षी मी माझ्या वडिलांना गमावले. मी त्यांच्या मृत्यूनंतर दु:खही व्यक्त करू शकले नाही. कारण माझी ७० वर्षांची आई आणि ९ वर्षांची मुलगी आहे; ज्यांची मला काळजी घ्यायची होती. मला त्यांच्यासाठी खंबीर राहावं लागलं. ज्यादिवशी मला कर्करोगाबद्दल कळलं, तेव्हा माझ्याचबरोबर असं का झालं? मी काय केलं? असं मला वाटलं. मी खूप हताश झाले.”
या आजारानंतर तनिष्ठाने तिच्या मुलीला बहिणीबरोबर अमेरिकेत पाठवलं आहे. याबद्दल अभिनेत्री म्हणाली, “मुलीला माझ्यापासून दूर जायचं नव्हतं; पण मला तिचं बालपण खराब करायचं नाही. तिला इथे एकटं वाटावं अशी माझी अजिबात इच्छा नाही. माझ्याशिवाय तिच्यावर प्रेम करणारे लोक आहेत याची जाणीव तिला व्हावी अशी माझी इच्छा आहे.”
यापुढे तनिष्ठाने आजाराबद्दल सांगितलं की, “मित्रांनो, अध्यात्म आणि योग मला आजाराचा सामना करण्यास मदत करत आहेत. माझा आजार आता हळूहळू बरा होत आहे. मी लवकरच बरी होईन असं डॉक्टरांनीही मला सांगितलं आहे. या आजारादरम्यान डोक्यावरचे आणि भुवयांचे केस गळणे, वजन कमी होणे अशा समस्या येतात; ज्याचा तुमच्यावर परिणाम होतो.”