Vaani Kapoor Fitness : मानसिक आणि शारीरिक आरोग्याबद्दल अलीकडे सर्वांमध्येच जागरूकता निर्माण झाली आहे. धावपळीच्या या आयुष्यात प्रत्येकजण स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. काहीजण स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम आणि डाएट फॉलो करतात. अनेक जण बॉलीवूडच्या कलाकारांकडूनही व्यायाम आणि डाएटच्या काही टिप्स फॉलो करतात. अशातच बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीनं तिचा फिटनेस फंडा शेअर केला आहे.

बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री वाणी कपूरनं तिच्या रोजच्या जीवनशैलीविषयी सांगितलं आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’शी साधलेल्या संवादात वाणीने तिच्या रोजच्या दिनक्रमाबद्दल, फिटनेसच्या सवयींबद्दल सांगितलं. वाणी म्हणते, “माझे सकाळचे ठरलेले रुटीन नाही, पण मी नेहमी ध्यानाने सुरुवात करते; त्यामुळे मन स्थिर होतं आणि दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा येते. ती एक वेगळी सवयही पाळते, ती म्हणजे स्पिरिच्युअल स्मजिंग. स्पिरिच्युअल स्मजिंग म्हणजे घरातील ऊर्जा शुद्ध करण्यासाठी धूप किंवा औषधी वनस्पतींचा धूर करणं.”

सकाळचे सगळे विधी पूर्ण केल्यावर वाणी थेट जिमकडे निघते. याबद्दल ती सांगते, “जर मी सकाळी वर्कआउट चुकवलं, तर दिवसभर कंटाळवाणं वाटतं. वर्कआउटच्या आधी मी विशेष खाणं घेत नाही, पण BCAA सप्लिमेंट्स घेते, जे स्नायूंना बळ देतात. माझा आहार संतुलित असतो. मी इंटरमिटंट फास्टिंग पाळते. मी पहिलं जेवण साधारण १० वाजता करते आणि रात्रीचं जेवण ६:३० किंवा ७ वाजता करते.”

यानंतर ती सांगते, “केटो किंवा पालेओसारखे डाएट्स माझ्याकडून होत नाहीत. माझ्या जेवणात चिकन, भाज्या, बदामाच्या पिठाचे पराठे आणि ग्लूटेन-फ्री रोट्या असतात. ती साखर, दुग्धजन्य पदार्थ टाळते. कधीतरी शुगर-फ्री आईस्क्रीम किंवा बदाम-झुकीनी ब्राऊनीही खाते. मी स्वतःला कधी उपाशी ठेवत नाही किंवा शिक्षाही करत नाही, कारण खाणं माझ्यासाठी एक प्रकारचं सुख आहे.”

यानंतर तिनं सांगितलं की, “शूटिंगदरम्यान मी कधी उपाशी राहत नाही. १२ ते १६ तासांचा दिवस असतो, म्हणून मग मी बाजरी, पॉपकॉर्न, मखाने आणि प्रोटीन बार सोबत घेऊनच जाते. “झोपायच्या आधी मी मॅग्नेशियम घेते, त्यामुळे छान झोप लागते. त्याचबरोबर सॅल्मन ऑईलच्या व्हिटॅमिन्सही घेते.