Chhaava Movie : विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चेत आहे. ‘छावा’चा ट्रेलर सोशल मीडियावर सर्वत्र ट्रेंड करत असतानाच यामधल्या नृत्यावर राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांनी तसेच शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. यावर राज्य सरकारनेही आक्षेप घेतला होता. अखेर आता या चित्रपटातील हा वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘छावा’ चित्रपटाबाबत राज ठाकरेंशी चर्चा केल्यावर लक्ष्मण उतेकरांनी माध्यमांशी संवाद साधला. दिग्दर्शक म्हणाले, “राज ठाकरे यांचं वाचन खूप आहे, विशेषत: महाराजांवर त्यांनी खूप वाचन केलं आहे, अनेक ऐतिहासिक संदर्भ सुद्धा त्यांना माहिती आहेत. त्यामुळे सिनेमात नेमके काय बदल केले पाहिजेत हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं. या चर्चेतून त्यांनी मला काही सूचना केल्या आहेत आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला मार्गदर्शन केलं आहे. याबद्दल राज साहेबांचे खूप खूप धन्यवाद”

कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता – लक्ष्मण उतेकर

चित्रपटातले काही सीन डिलिट होणार का? याबद्दल विचारलं असता लक्ष्मण उतेकर म्हणाले, “लेझीम खेळतानाची दृष्य आम्ही डिलिट करणार आहोत. राज साहेबांनी सुद्धा मला तोच सल्ला दिला आहे. यामागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता. पण, जर त्याच्यामुळे अप्रत्यक्षपणे कोणाच्या भावना दुखावणार असतील, तर ती दृष्य नक्की डिलीट करणार. कारण, तो सीन चित्रपटाचा मोठा भाग नाहीये…तो नक्कीच डिलीट करणार.”

“छत्रपती संभाजी महाराज काय होते हे संपूर्ण जगाला कळावं याच उद्देशाने हा चित्रपट बनवला आहे. आम्ही ४ वर्षांपासून हा चित्रपट बनवत आहोत, त्यामुळे, अशा १-२ गोष्टी त्याला गालबोट लावणार असतील तर, त्या डिलीट करायला आम्हाला काहीच हरकत नाहीये.” असं स्पष्ट मत लक्ष्मण उतेकर यांनी मांडलं आहे.

दरम्यान, ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेता विकी कौशलसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना, अभिनेता अक्षय खन्ना असे कलाकार झळकणार आहेत. चित्रपटात सुव्रत जोशी, शुभंकर एकबोटी, संतोष जुवेकर असे मराठी कलाकार देखील झळकले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhaava movie director laxman utekar meets raj thackeray says team will deletes controversial scene sva 00