Chhaava Movie : छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘छावा’ सिनेमात अभिनेता विकी कौशलने प्रमुख भूमिका साकारली आहे. सिनेमाची पहिली झलक समोर आल्यापासूनच विकीने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे. चित्रपट पाहताना क्लायमॅक्सला प्रेक्षक भावुक होत असल्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ‘छावा’मधले अनेक सीन्स लक्षवेधी ठरले आहेत. यापैकी एका सीनची आठवण विकी कौशलने आईएमडीबीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज आपल्या मावळ्यांना संबोधित करत असतात असा सीन चित्रपटात पाहायला मिळतो. या संपूर्ण सीननंतर शेवटी महाराज, “ॐ नमः पार्वती पतये, हर हर महादेव…” असं म्हणतात. यानंतर संपूर्ण मराठा सैन्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. हा सीन ‘छावा’च्या ट्रेलरमध्ये सुद्धा आहे. याबद्दलचा एक खास किस्सा विकी कौशल व दिग्दर्शकांनी सांगितला आहे.

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सांगतात, “ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव… ही ओळ मूळ स्क्रिप्टमध्ये नव्हतीच. ही ओळ घेणं हे विकीचं अ‍ॅडिशन होतं आणि त्या संवादाने एक वेगळीच जादू, एक वेगळीच ऊर्जा सेटवर निर्माण केली. तो सीन पूर्ण झाल्यावर मी लगेच गेलो आणि विकीला मिठी मारली. माझं असं झालं हे कसं सुचलं हे लिहिलेलं नव्हतंच. त्या वाक्याची एनर्जी भन्नाट होती. हे सगळं केवळ विकीच करू शकतो.”

या सीनबाबत सांगताना विकी म्हणाला, “जय भवानी, जय भवानी… हर हर महादेव असं वाक्य मूळ स्क्रिप्टमध्ये होतं. पण, मला माहिती नाही अचानक काय झालं… त्या ओघाओघात मी ॐ नमः पार्वती पतये, हर हर महादेव…असं म्हणालो. हे वाक्य आम्ही आधीच ठरवलेलं नव्हतं. आपोआप ते फ्लोमध्ये मी बोलून गेलो. जेव्हा हा सीन पूर्ण झाला तेव्हा लक्ष्मण सर पण आनंदी झाले होते. माझ्या आजूबाजूला जे अन्य कलाकार होते त्यांनी सुद्धा हा सीन करताना मला खूप चांगली साथ दिली.”

दरम्यान, ‘छावा’ सिनेमाने अवघ्या ४ दिवसांच बॉक्स ऑफिसवर १४५ कोटींचा गल्ला जमावला आहे. यामध्ये विकीसह रश्मिका मंदाना, आशुतोष राणा, अक्षय खन्ना, विनीत सिंह, डायना पेंटी, संतोष जुवेकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhaava movie om namah parvati pataye scene was not there in script reveals vicky kaushal and director sva 00