Coolie vs War 2: १४ ऑगस्टला दोन मोठे चित्रपट सिनेमागृहांमध्ये रिलीज झाले. एक रजनीकांत यांचा ‘कुली’ आणि दुसरा म्हणजे हृतिक रोशनचा ‘वॉर २’. या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. दोन्ही चित्रपटांनी दमदार ओपनिंग केली होती. त्यानंतर आता त्यांच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. दुसऱ्या दिवशी कोणता चित्रपट वरचढ ठरला ते जाणून घेऊयात.
गुरुवारी म्हणजेच रिलीजच्या पहिल्या दिवशी ‘कुली’ कमाईच्या बाबतीत पुढे होता. आता दुसऱ्या दिवशी ‘वॉर २’ ने बॉक्स ऑफिसवर आपली ताकद दाखवली आहे. पण ‘कुली’चा दबदबा देखील कायम आहे. स्वातंत्र्यदिनी भारतात कोणत्या चित्रपटाने किती कोटी रुपयांचे कलेक्शन केले? त्याची आकडेवारी इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिली आहे.
वॉर २ चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘वॉर २’ ने भारतात पहिल्या दिवशी ५२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. यामध्ये हिंदी भाषेतील २९ कोटी आणि तेलुगू भाषेतील २२.७५ कोटींचा समावेश होता. पण, हा चित्रपट पहिल्या भागाचा म्हणजेच वॉरचा ५३ कोटींचा ओपनिंग रेकॉर्ड मोडू शकला नाही. आता त्याच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत, ज्यामध्ये थोडी वाढ दिसून येत आहे.
‘वॉर २’ ने दुसऱ्या दिवशी चांगली कमाई केली आणि शुक्रवारी ५६.५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. ज्युनियर एनटीआर व हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ चित्रपटाने भारतात दोन दिवसांत १०८ कोटी रुपये कमावले आहेत.
कुली सिनेमाचे कलेक्शन किती?
रजनीकांत यांच्या ‘कुली’ चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या दिवशी घट झाली. सॅकनिल्कच्या मते, चित्रपटाने भारतात ६५ कोटी रुपये कमावून दमदार ओपनिंग केली. पण दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट झाली. कुलीने दुसऱ्या दिवशी ५३.५० कोटी रुपये कमावले. ‘कुली’ चित्रपटाची दोन दिवसंची भारतातील कमाई ११८.५० कोटी रुपये झाली आहे. कमाईच्या बाबतीत ‘कुली’ ‘वॉर २’ पेक्षा पुढे आहे.
निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांच्या कुली चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात १५१ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. कोणत्याही तमिळ चित्रपटासाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग आहे.
‘कुली’ चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराजने केले आहे. रजनीकांत नागार्जुन, श्रुती हासन, सौबिन शाहीर आणि उपेंद्र यांच्या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. आमिर खानने ‘कुली’ मध्ये कॅमियो केला आहे. तर, अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर २’मध्ये कियारा अडवाणी आणि आशुतोष राणा देखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी ३०० कोटींहून रक्कम खर्च करण्यात आली आहे.