Dharmendra And Amitabh Bachchan Fees of Sholay: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहेत. सध्या त्यांना घरी आणले असून त्यांच्यावर घरी उपचार सुरू आहेत.

धर्मेंद्र यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत अनेक चित्रपटांत काम केले. इतकेच काय, वयाच्या ८७ व्या वर्षी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात ते दिसले होते. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता.

धर्मेंद्र यांची प्रमुख भूमिका असलेला ‘शोले’ हा चित्रपट प्रचंड गाजला. आजही या चित्रपटाचा मोठा चाहतावर्ग आहे. या चित्रपटात जय, वीरू, बसंती, ठाकूर, गब्बर ही सगळी पात्रे प्रचंड गाजली. आजही या पात्रांचा, सिनेमाचा, डायलॉगचा आणि या सिनेमातील कलाकारांचा मोठा चाहतावर्ग आहे.

धर्मेंद्र यांनी या चित्रपटात वीरू ही भूमिका साकारली होती. हा सिनेमा १९७५ साली प्रदर्शित झाला होता. पण, तुम्हाला माहीत आहे का, धर्मेंद्र यांनी सुरुवातीला या चित्रपटात वीरू ही भूमिका साकारण्यास नकार दिला होता.

“ठाकूरची गोष्ट…”

‘शोले’ चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत धर्मेंद्र यांना शोलेमध्ये काम करायचे नव्हते, असा खुलासा केला होता. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा चित्रपटाची गोष्ट ऐकली, तेव्हा त्यांना ती आवडली नव्हती.

रमेश सिप्पी म्हणाले, धर्मेंद्र मला म्हणालेले की ही ठाकूरची गोष्ट आहे आणि गब्बर त्याच्याविरुद्ध लढत आहे, यामध्ये आम्ही काय करणार? आमची भूमिका काय असणार? त्यावर मी त्यांना म्हणालेलो की ठीक आहे, तुम्ही ठाकूरची भूमिका साकारा किंवा मग गब्बरची भूमिका साकारा. पण, तुमची हिरोईन हेमा मालिनी असणार नाही. माझे हे बोलणे ऐकल्यानंतर धर्मेंद्र वीरूची भूमिका साकारायला तयार झाले होते.

अमिताभ बच्चन नाही तर ‘हा’ अभिनेता होता पहिली पसंती

शोलेबद्दल आणखी एक गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे. शोलेसाठी अमिताभ बच्चन हे पहिली निवड नव्हते, तर सुरुवातीला शत्रुघ्न सिन्हा यांना जय या भूमिकेसाठी विचारले होते.

‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “शोलेमधील अमिताभने साकारलेल्या भूमिकेसाठी सुरुवातीला मला विचारले होते. रमेश सिप्पींनी त्यांच्या पुस्तकात याबद्दल लिहिले आहे. पण, त्यावेळी मी अनेक चित्रपटांत काम करत होतो. शोलेसाठी मी वेळ काढण्याचा प्रयत्न केला, पण मला ते शक्य झाले नाही. मला वाटते की मी तो चित्रपट करायला हवा होता, पण ते झाले नाही. मात्र, अमिताभसाठी खूश आहे. या चित्रपटातून त्याला ब्रेक मिळाला. तो देशपातळीवर ओळखला जाऊ लागला.”

धर्मेंद्र यांचे मानधन

शोलेमध्ये धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच हेमा मालिनी, जया बच्चन, संजीव कुमार, अमजाद खान असे अनेक लोकप्रिय कलाकार दिसले होते. यांच्यासह आणखी काही कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले होते. यापैकी धर्मेंद्र यांना सर्वात जास्त मानधन दिले होते. त्यांना १.५ लाख मानधन दिले होते, तर अमिताभ बच्चन यांना १ लाख मानधन दिले होते.

दरम्यान, स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत धर्मेंद्र यांनी ‘प्रतिज्ञा’, ‘सत्यकाम’ आणि ‘शोले’ हे चित्रपट त्यांचे आवडते असल्याचे म्हटले होते.