झोया अख्तरचा ‘द आर्चीज’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून त्याला मिश्र प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात झोयाने बऱ्याच स्टारकिड्सना संधी दिली आहे. या चित्रपटाच्या मध्यमातून जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर, शाहरुख खानची लेक सुहाना खान व अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. यामुळेच या चित्रपटावर आणि पर्यायाने झोया अख्तरवर नेपोटीजमला खतपाणी घालण्यावरुन चर्चा सुरू असून प्रेक्षक यावर चांगलीच टीका करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : ‘अ‍ॅनिमल’स्टार रणबीरबरोबर पुन्हा कधीच काम करू इच्छित नाही अनुराग कश्यप; दिग्दर्शकाने सांगितलं कारण

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान झोयाने नेपोटीजमवरुन सुरू असलेल्या चर्चेला आणि वादाला उत्तर दिलं आहे. ही चर्चा फारच किरकोळ असल्याचं झोयाने स्पष्ट केलं. मुलाखतीदरम्यान झोया म्हणाली. “बऱ्याच स्टारकिड्सना मिळणाऱ्या सोयी-सुविधा, त्यांची जीवनशैली याबद्दल चर्चा होणं ठीक आहे, अन् चित्रपटसृष्टीतील बऱ्याच लोकांशी असलेला स्टारकिड्सचा थेट संबंध यावरुनही चर्चा व्हायला काहीच हरकत नाही. सगळ्यांना शिक्षण अन् संधी समान मिळायला हव्यात इथवर ठीक आहे, पण माझ्या चित्रपटात सुहाना खान दिसायला नको ही चर्चाच मुळात बाळबोध आहे.”

पुढे झोया म्हणाली, “माझे वडील जेव्हा इथे आले तेव्हा त्यांनी अगदी शून्यापासून सुरुवात केली. मी याच इंडस्ट्रीमध्ये लहानाची मोठी झाले, त्यामुळे मी काय करायचं आहे हे ठरवायचा सर्वस्वी अधिकार माझाच आहे. मी नेमकं काय करणं अपेक्षित आहे? मला जर फिल्ममेकर बनायचं असेल तर मी माझ्या वडिलांचं अस्तित्त्वच नाकारायला हवं का? मी माझं उद्योगविश्वही निवडू शकत नसेन तर त्याला काहीच अर्थ नाही. उद्या चित्रपटसृष्टीत जन्मलेल्या एकाही स्टारकीडने चित्रपटात काम करायचं नाही असं ठरवलं तरी त्याने तुमच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाहीये.”

पुढे नेपोटीजमच्या खऱ्या व्याख्येविषय झोया म्हणाली, “मी जेव्हा लोकांचा पैसा घेऊन माझ्या मित्रांवर आणि कुटुंबावर उडवते त्याला नेपोटीजम म्हणतात. माझ्या पैशाने मी काय करावं आणि काय नाही हे मला सांगणारे तुम्ही कोण? उद्या जर मला माझ्या भाचीवर पैसा खर्च करायचा असेल तर तो सर्वस्वी माझा प्रश्न आहे. सरतेशेवटी एखादा अभिनेता किंवा दिग्दर्शक यांना काम मिळतं ते केवळ प्रेक्षकांच्या बळावरच, प्रेक्षक ठरवतात त्यांना कोणाला पाहायचं आहे आणि कोणाला नाही.”

याआधीही एका मंचावर झोया अख्तरवे वडील अन् प्रसिद्ध कवि व लेखक जावेद अख्तर यांनीही नेपोटीजमबाबत असंच मत मांडलं होतं. इंडस्ट्रीमध्ये नेपोटीजम अजिबात नाही असं वक्तव्य तेव्हा जावेद अख्तर यांनी केलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director zoya akhtar says nepotism debate is banal and baseless avn