सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास दोन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर ही घटना घडली. यानंतर मुंबई पोलीस, गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध टीम्स त्याच्या निवासस्थानी पोहोचल्या. याशिवाय अनेक सेलिब्रिटींकडून सलमानची विचारपूस करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून सध्या नवी मुंबईतून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

सलमान खान गेली अनेक वर्षे वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. भाईजानच्या घरी नेहमीच अनेक सेलिब्रिटींचा गोतावळा असतो. त्याच्या घरी अनेक कलाकार भेट देत असतात. आजच्या घडीला हजारो कोटींचा मालक असलेला सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये का राहतो? असा प्रश्न त्याच्या बहुसंख्य चाहत्यांना पडला आहे. भाईजानच्या याच घराबाहेर हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. याआधी २००९ मध्ये फराह खानच्या ‘तेरे मेरे बीच में’ या कार्यक्रमात सलमानला त्याच्या घराबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी आई-बाबांच्या जवळ राहता यावं यासाठी त्याने घर बदललं नाही असं अभिनेत्याने सांगितलं होतं.

हेही वाचा : Video: सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबार, मराठमोळा शिव ठाकरे म्हणाला, “आमच्यासारखे…”

“बॉलीवूडमध्ये तू सुपरस्टार आहेस. करोडोंच्या घरात संपत्ती आहे, तरी आजही तू १ बीएचके घरात का राहतोस? तुझं घर तुझ्या आईच्या घराखाली आहे हे यामागचं कारण आहे का?” असा प्रश्न फराह खानने सलमानला विचारला. यावर सलमान खान म्हणाला, “हो खरंतर आमच्या घरी तीन रुम्स आणि हॉल होता. परंतु, आता या घरात एकच बेडरुम हॉल कसा राहिला मला माहिती नाही.” सलमान खानचे घर गॅलेक्सी अपार्टमेंटच्या तळमजल्यावर आहे. तर, त्याचे आई-बाबा पहिल्या माळ्यावर राहतात.

हेही वाचा : घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानची पहिली पोस्ट, व्हिडीओ केला शेअर

फराह पुढे विचारते, “मला वाटतं कदाचित आई-बाबांच्या जवळ राहून तुझ्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यावर सलमान सांगतो, हो कारण, जेव्हा मी त्यांच्या घरी म्हणजे वरच्या मजल्यावर राहायला जातो, तेव्हा मी आई-वडिलांच्या शेजारी झोपतो.”

हेही वाचा : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात दोघांना गुन्हे शाखेने घेतलं ताब्यात

अनेकदा सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर प्रचंड गर्दी झालेली असते. अशावेळी पोलीस अधिकारी सलमानला एकदा येऊन चाहत्यांना अभिवादन कर जेणेकरून रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही असं सांगतात. अलीकडेच ईदच्या निमित्ताने सलमान घराच्या बाल्कनीत आला होता. यावेळी त्याच्या चाहत्यांनी परिसरात मोठी गर्दी केली होती. दरम्यान, गोळीबार प्रकरणाबाबत सांगायचं झालं, त्या घटनेनंतर गॅलेक्सी अपार्टमेंट परिसरातील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. लवकरच सलमान ठरलेल्या नियोजनानुसार त्याची शूटिंगची कामं पूर्ण करणार आहे.