‘घर से निकलते ही…कुछ दूर चलते ही…’ या लोकप्रिय गाण्यातील अभिनेत्री तुम्हाला आठवतेय का? या गाण्यात झळकलेल्या अभिनेत्रीचं नाव मयुरी कांगो असं आहे. एकेकाळी अनेक चित्रपट व टीव्ही मालिका करणाऱ्या मयुरीने सिनेइंडस्ट्रीला अलविदा केलं आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. आता ती गुगलमध्ये उच्च पदावर काम करतेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१५ ऑगस्ट १९८२ रोजी महाराष्ट्रातील तत्कालीन औरंगाबाद इथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते भालचंद्र कांगो व अभिनेत्री सुजाता कांगो यांच्या घरी मयुरीचा जन्म झाला. मयुरी ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. मयुरीने तिचे शालेय शिक्षण (Mayoori Kango Education) सेंट फ्रान्सिस स्कूल, औरंगाबाद इथून घेतले. तिने पुढील शिक्षण देवगिरी कॉलेजमधून पूर्ण केले. मयुरी अभ्यासात हुशार होती आणि लहानपणापासूनच तिने मोठ्या कंपनीची सीईओ व्हायचं स्वप्न पाहिलं होतं, पण आईमुळे ती अभिनेत्री झाली.

मयुरीचा पहिला चित्रपट

१२वीत असताना मयुरी आईबरोबर मुंबईत आली होती. दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनी मयुरीला पाहिलं आणि तिला चित्रपटाची ऑफर दिली. मयुरीने ऑफर स्वीकारली. तिच्या ‘नसीम’ नावाच्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मयुरीने नंतर आयआयटी कानपूरमध्ये शिकत असताना चित्रपटासाठी शिक्षण अर्ध्यावर सोडलं. तिने अजय देवगण, महेश बाबू आणि संजय दत्त यांसारख्या बड्या कलाकारांसह काम केलं. ‘नसीम’ चित्रपटात मयुरीची आई सुजाता यांनीही काम केलं होतं.

महेश भट्ट यांनी दिली ऑफर

मयुरीला ‘नसीम’मध्ये पाहिल्यावर महेश भट्ट यांनी तिला ‘पापा कहते हैं’ या चित्रपटात जुगल हंसराजबरोबर साईन केलं. या चित्रपटातील ‘घर से निकलते ही’ हे गाणं खूप गाजलं. हा चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हिट झाला आणि मयुरीने अभिनयात करिअर करायचं ठरवलं. तिने ‘बेताबी’, ‘होगी प्यार की जीत’ आणि ‘मेरे अपने’मध्ये काम केले. २००० मध्ये मयुरी राणी मुखर्जीच्या ‘बादल’ या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसली.

अभिनेत्री मयुरी कांगो (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

बॉलीवूडच्या ऑफर कमी झाल्या अन्…

मयुरीने फिल्म इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला व तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या, तिने अनेक चित्रपट साइन केले. पण मयुरीने जे चित्रपट साइन केले ते कोणत्या ना कोणत्या कारणाने पूर्ण झाले नाहीत. मयुरीचा पायगुण वाईट असल्याचं म्हटलं जाऊ लागलं आणि तिला ऑफर मिळणं कमी झालं. एक-दोन चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्यावर मयुरी दाक्षिणात्य इंडस्ट्रीत गेली, पण तिथेही अपयश आलं. मग तिने ‘नर्गिस’, ‘कहीं किसी रोज’, ‘डॉलर बहू’, ‘किट्टी पार्टी’, ‘कुसुम’, ‘करिश्मा’ आणि ‘क्या हादसा क्या हकीकत’ या मालिकांमध्ये काम केलं. पण नंतर तिने हे क्षेत्र सोडायचं ठरवलं.

…अन् मयुरीने सिनेइंडस्ट्री सोडली

मयुरीने २००३ मध्ये एनआरआय उद्योगपती आदित्य ढिल्लनशी लग्न केलं आणि सिनेइंडस्ट्रीला रामराम ठोकला. ती पतीबरोबर अमेरिकेला स्थायिक झाली. इथे तिचं जुनं स्वप्न तिला पुन्हा खुणावू लागलं. मग मयुरीने अभ्यास करून एमबीए शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवली. त्यानंतर तिथे अनेक वर्षे नावाजलेल्या कंपन्यांमध्ये काम केलं. त्याच काळात तिच्या मुलाचा जन्म झाला. मुलाचा सांभाळ व नोकरी करणं कठीण होतं, पण तिला नोकरी सोडायची नव्हती. नंतर मयुरीला भारतातील एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदाच्या नोकरीची ऑफर आली. ती तिच्या मुलासह २०११ मध्ये भारतात परतली.

Mayoori Kango is Google India industry head: अभिनेत्री अशी ओळख असलेल्या मयुरीने स्वतःला या इंडस्ट्रीत सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत केली. मयुरीच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीला यश आलं. तिला २०१९ मध्ये गुगलने भारताची हेड ऑफ इंडस्ट्री म्हणून ऑफर दिली. तेव्हापासून ती गुगलमध्ये काम करतेय.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former bollywood actress mayoori kango is google india industry head hrc