Genelia Deshmukh : जिनिलीया आणि रितेश देशमुख यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. या जोडप्याचा मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. यामुळे या दोघांना महाराष्ट्राचे ‘दादा-वहिनी’ म्हणून ओळखलं जातं. एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर रितेश-जिनिलीयाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. देशमुखांच्या घरी सगळे मराठी सणवार एकत्र आनंदाने साजरे केले जातात. आज रक्षाबंधनाचा सण देखील सगळ्या कुटुंबीयांनी एकत्र मिळून साजरा केला.
जिनिलीया व रितेश यांना रियान व राहिल अशी दोन मुलं आहे. आज रक्षाबंधनाच्या सणानिमित्त अभिनेत्रीने तिच्या लाडक्या पुतणीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. जिनिलीयाची दोन्ही मुलं धिरज व दीपशिखा देशमुख यांची मुलगी दिवीयानासह रक्षाबंधन साजरा करतात.
देशमुखांच्या घरात सगळ्या भावांना दिवीयाना राखी बांधते. कारण, रितेशचे मोठे बंधू अमित देशमुख यांनाही दोन मुलं आहेत. “हा तुझा दिवस आहे दिवी…” असं कॅप्शन देत जिनिलीयाने रक्षाबंधन साजरा केल्याचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या व्हिडीओमध्ये हाताने बनवलेल्या राख्या, मिठाई, गिफ्ट्स या सगळ्याची झलक पाहायला मिळत आहे.
जिनिलीयाने या व्हिडीओला “धागों से बांधा, एहसास दिल के रिश्ते का…” हे अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ सिनेमातील गाणं लावलं आहे. यामध्ये दिवीयाना तिच्या सगळ्या भावांचं एकत्रित औक्षण करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, जिनिलीया देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ती आमिर खानच्या ‘सितारें जमीन पर’ सिनेमात झळकली होती. आता रितेश-जिनिलीया सध्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १ मे २०२६ रोजी ( महाराष्ट्र दिन ) हा सिनेमा एकूण ६ भाषांमध्ये प्रदर्शित होईल. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी असेल.