Govinda wife Sunita Ahuja : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक चर्चा होत आहेत. काही दिवसांपूर्वी गोविंदा आणि सुनीता यांच्यात मतभेद झाले आहेत आणि दोघेही घटस्फोट घेण्याचा विचार करत आहेत असे वृत्त आले होते. मात्र, गोविंदाची पत्नी सुनीताने या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्टपणे सांगितलं.

घटस्फोटाबद्दलच्या वृत्तांनंतर सुनीताने मुलाखतींमधून हे स्पष्ट केलं की, ती गोविंदाबरोबर अगदी आनंदात आहे आणि ती त्याच्यापासून घटस्फोट घेत नाहीये. घटस्फोटाच्या या चर्चांदरम्यान लोकांच्या लक्षात आले की, सुनीताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ‘आहुजा’ हे आडनाव काढून टाकलं आहे आणि तिने तिच्या सुनीता या नावापुढे इंग्रजीतील ‘एस’ हे अक्षर जोडलं आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत सुनीताने यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे. टाईम्स ऑफ इंडियानुसार सुनीताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आडनाव काढण्यामागचं कारण अंकशास्त्र असल्याचं म्हटलं आहे. अंकशास्त्रानुसार सुनीताने तिच्या नावात बदल केला आहे आणि हा बदल गेल्या एक वर्षापूर्वी केला असल्याचेही तिने सांगितलं. तसंच सुनीताने असाही दावा केला की, हा बदल केल्यानंतर तिला प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली.

याबद्दल सुनीता म्हणाली, “मी आहुजा आडनाव काढून टाकलं आणि माझ्या सुनीता नावात ‘एस’ हे इंग्रजी अक्षर जोडलं. पण, हा बदल एका वर्षापूर्वीच केला आहे आणि हे पूर्णपणे अंकशास्त्राच्या उद्देशाने केलं आहे. मला नाव आणि प्रसिद्धी हवी होती म्हणून मी हे केलं.” नावातील बदलामुळे तिला अपेक्षित असलेली प्रसिद्धी मिळाली का? असे विचारले असता सुनीता हसत हसत म्हणाली, “अगदीच. गेल्या काही महिन्यांत मी किती व्हायरल झाली आहे ते तुम्हाला माहीत आहे ना?”

मी माझं आहुजा आडनाव कधीही बदलणार नाही : सुनीता आहुजा

यानंतर सुनीता आडनावाबद्दल म्हणाली, “मी आहुजा आहे आणि मी माझं आडनाव कधीही बदलणार नाही. हे जग सोडून गेल्यानंतरच माझं आडनाव काढलं जाईल.” यापुढे सुनीताने घटस्फोटाच्या अफवांबद्दल असं म्हटलं, “आम्ही एक आनंदी कुटुंब आहोत, जोपर्यंत आमच्या दोघांकडून थेट काही सांगितलं जात नाही; तोपर्यंत कोणीही काहीही गृहीत धरू नका.”

“गोविंदा माझ्याशिवाय आणि मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही : सुनीता आहुजा

याशिवाय झूमला दिलेल्या मुलाखतीत सुनीताने असं म्हटलं होतं, “गोविंदा माझ्याशिवाय आणि मी गोविंदाशिवाय राहू शकत नाही. गोविंदा कधीही कोणत्याही व्यक्ती किंवा महिलेसाठी त्याच्या कुटुंबाला सोडू शकत नाही. या सगळ्या अफवा आहेत. मी हे कधीच स्वीकारणार नाही आणि कोणामध्ये हिंमत असेल त्यांनी समोरून मला येऊन विचारावं.”