Hera Pheri 3 Paresh Rawal : ‘हेरा फेरी ३’या बॉलीवूड चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. हा आगामी चित्रपट गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. परेश रावल अचानक चित्रपटातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आणि अनेकांना धक्काच बसला. त्यानंतर चाहत्यांनी त्यांना पुन्हा चित्रपटात परत येण्यासाठी अक्षरश: सोशल मीडियासह विविध माध्यमातून विनवणी केली. त्यानंतर अक्षय कुमारनंही अभिनेत्याविरुद्ध २५ कोटी रुपयांचा खटला दाखल केला होता.
अशातच आता या चित्रपटासंबंधित वाद मिटला आहे आणि परेश रावलही ‘हेरा फेरी ३’मध्ये पुन्हा परतले आहेत. याबद्दल त्यांनी स्वत:च घोषणा केली. त्यामुळे चाहत्यांनी पुन्हा एकदा आनंद व्यक्त केला आहे. परेश रावल यांच्या ‘हेरा फेरी ३’मधील एन्ट्रीबद्दल आता चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार प्रियदर्शन यांनी सांगितले की, परेश रावल यांनी त्यांची माफी मागितली.
याबद्दल प्रियदर्शन म्हणाले, “अक्षय आणि परेश दोघांनीही फोन करून सांगितले की सर्व काही ठीक झालं आहे. परेश यांनी मला मी चित्रपट करत आहे असं सांगितलं तेव्हा धक्का बसला. ते मला म्हणाले की, तुमच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. मी तुमच्याबरोबर अनेक चित्रपट केले आहेत आणि चित्रपट सोडल्याबद्दल मला वाईट वाटलं. काही वैयक्तिक समस्या होत्या. पण अक्षय, सुनील आणि मी… आम्ही त्या सगळ्या समस्या सोडवल्या आहेत.”
‘हेरा फेरी ३’मध्ये इतर कोणाचाही सहभाग नाही : प्रियदर्शन
यापुढे प्रियदर्शन म्हणाले, “मी मनोरंजन क्षेत्रामधील राजकारणावर कधीच विश्वास ठेवत नाही. सुनील, अक्षय आणि परेश हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्यात काही मतभेद होते, जे आता दूर झाले आहेत. अक्षय, परेश आणि सुनील आम्ही सर्वजण एकत्र बसून ठरवलं की, आपण हा चित्रपट करू. त्याचा इतर कोणाशीही काहीही संबंध नाही. कोणीतरी म्हणत आहे की, यात कोणाचा तरी विशेष सहभाग आहे; पण तसं काही नाही.”
दरम्यान, प्रियदर्शन ‘हेरा फेरी ३’चं दिग्दर्शन करत आहेत आणि फिरोज नाडियाडवाला या चित्रपटाचे निर्माते आहेत. परेश रावल या चित्रपटात आता पुन्हा एकदा बाबू भैय्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसंच अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे त्रिकूटही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.