Hrithik Roshan shares unseen childhood photos: राकेश रोशन यांना बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक म्हणून ओळखले जाते. काही वर्षे अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी दिग्दर्शनाकडे मोर्चा वळवला.

काही दिवसांपूर्वी त्यांनी हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ चित्रपटातील ‘आवां जावां’ गाण्यावर भन्नाट डान्स केला होता. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. माझे वडलही काही कमी नाहीत, असे म्हणत हृतिक रोशनने हा व्हिडीओ शेअर केला होता.

त्यावर नेटकऱ्यांनी ७५ वर्षीय राकेश रोशन यांच्या डान्सचे कौतुक केले होते. आता बाप-लेकाची ही जोडी पुन्हा चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे हृतिक रोशनने वडील राकेश रोशन यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आज राकेश रोशन यांचा ७६ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हृतिक रोशनने आतापर्यंत चाहत्यांनी न पाहिलेले काही फोटो शेअर केले आहेत. तसेच, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच, ते त्याच्या आयुष्यातील सर्वांत उत्तम शिक्षक असल्याबद्दलच्याही भावना त्याने व्यक्त केल्या होत्या.

अभिनेत्याने शेअर केलेल्या एका फोटोत हृतिक त्याच्या कुटुंबाबरोबर वाढदिवस साजरा करताना दिसत आहे आणि त्याचे वडील राकेश त्याच्या शेजारी उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये हृतिक राकेश रोशन यांच्या मांडीवर बसल्याचे दिसत आहे. आणखी एका फोटोमध्ये हृतिक आणि राकेश यांच्याबरोबर पिंकी रोशन आणि सुनैना रोशनबरोबर दिसत आहे. हृतिक रोशनने शेअर केलेले काही फोटो हे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे असल्याचे दिसत आहे.

“परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तुम्ही…”

फोटो शेअर करताना हृतिक रोशनने लिहिले, “बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तुम्ही माझ्यात लवचिकता निर्माण केलीत. त्यामुळे जेव्हा आयुष्य कठीण वाटते, तेव्हा माझ्यातल्या या लवचिकतेमुळेच त्या कठीण प्रसंगाला सामोरे जाणे सुसह्य होते. आयुष्यातील कोणतेही संकट माझ्यातल्या सैनिकाला हरवू शकत नाही. इतक्या वर्षांत मी एखाद्या गोष्टीची दुसरी बाजूदेखील बघायला शिकलो आहे आणि मला माहीत आहे की, तुम्हीदेखील ही गोष्ट शिकला आहात.”

पुढे त्याने असेही लिहिले, “कठीण मार्ग स्वीकारला म्हणूनच माझ्यामध्ये शहाणपण आले. माझ्यात तो सैनिक निर्माण केल्याबद्दल, तुम्ही सर्वोत्तम शिक्षक असल्याबद्दल धन्यवाद! मी तुमचा मुलगा आहे, याचा मला खूप अभिमान आहे. मी तुमच्यावर प्रेम करतो”, असे लिहीत त्याने हार्ट इमोजी शेअर केल्या.

अभिनेत्याने शेअर केलेल्या या फोटोंवर अनेक कलाकारांसह चाहत्यांनी प्रेम व्यक्त केले आहे. तसेच, राकेश रोशन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हृतिक रोशनच्या कामाबद्दल बोलायचे तर, नुकताच तो ‘वॉर २’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता आगामी काळात तो कोणच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.