Ibrahim Ali Khan on parents Saif Ali Khan Amrita Singh Divorce :सैफ अली खान व अमृता सिंह यांचा २००४ मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर इब्राहिम अली खान व सारा अली खान या सेलिब्रिटी भावंडांचे संगोपन त्यांची आई अमृताने केले. सैफचं सारा व इब्राहिमशी खूप चांगलं नातं आहे. दोघेही वडिलांबरोबर सण-उत्सव साजरे करताना दिसतात. पण ते अमृताबरोबरच राहतात.

सैफ अली खानने २०१२ मध्ये अभिनेत्री करीना कपूरशी दुसरे लग्न केले. राजीव मसंदला दिलेल्या मुलाखतीत इब्राहिमने त्याच्या आई-वडिलांच्या ब्रेकअपचा त्याच्यावर आणि सारावर कसा परिणाम झाला याबद्दल सांगितलं.

अमृता व सैफच्या घटस्फोटाच्या परिणामांबद्दल विचारल्यावर इब्राहिम म्हणाला की दोघांनी मुलांसमोर खूप काळजीपूर्वक परिस्थिती हाताळली. “मी चार-पाच वर्षांचा होतो, म्हणून मला फारसं आठवत नाही. सारा मोठी असल्याने तिच्यासाठी परिस्थिती वेगळी होती. पण माझ्या आई-वडिलांनी मला त्यांच्या घटस्फोटाचा त्रास होऊ नये यासाठी खूप चांगलं काम केलं. मी त्यांना कधीही एकमेकांवर रागावलेले पाहिले नाही. काही गोष्टी कायम तशाच राहत नाहीत,” असं इब्राहिम म्हणाला.

सैफ करीनाबरोबर आनंदी – इब्राहिम

इब्राहिमला त्याचे वडील आता दुसऱ्या बायकोबरोबर जास्त आनंदी वाटतात. “आता माझे वडील बेबोबरोबर (करीना कपूर) खूप आनंदी आहेत आणि मला दोन अतिशय देखणे आणि खोडकर भाऊ आहेत. माझी आई सर्वात चांगली आई आहे. ती माझी खूप काळजी घेते आणि मी तिच्याबरोबर राहतो. आता सगळं चांगलं आहे,” असं इब्राहिम अली खान म्हणाला.

इब्राहिमने ‘नादानियां’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्याचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. इब्राहिमच्या अभिनयाला नकारात्मक प्रतिसाद मिळाला, पण त्याला दोन लोकांनी खूप चांगले सल्ले दिले. हे दोन जण म्हणजे इब्राहिमचे वडील सैफ अली खान आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा होय. “माझ्या वडिलांनी सांगितलं होते की हे २००० चे वर्ष नाही जेव्हा एखादा स्टार फक्त चित्रपटात काम करेल आणि तो ब्लॉकबस्टर होईल. आता तुम्ही यश-अपयशाचा सामना करायला तयार असलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गोष्टी लवकर शिकायला हव्या. पटकथा आणि चित्रपट निर्माता या दोन गोष्टींशी तुम्ही तडजोड करू शकत नाही,” असं असं इब्राहिम म्हणाला.

“दुसरा मेसेज प्रियांका चोप्राकडून आला होता. तिने मला एक छान पाठवला की तिने चित्रपट पाहिलाय आणि तिला वाटतं की माझं भविष्य उज्ज्वल आहे. तिच्यासारख्या कर्तृत्ववान अभिनेत्रीने माझा चित्रपट पाहून मला मेसेज केल्याने मला खरोखरच खूप प्रेरणा मिळाली,” असं इब्राहिम म्हणाला. दरम्यान, ‘नादानियां’नंतर इब्राहिम अली खान ‘सरजमीं’ व ‘दिलेर’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं तो शूटिंग करतोय.