Actor Jeetendra Sold land in Mumbai for 855 Crore : ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते जितेंद्र कपूर आणि त्यांच्या कुटुंबाने मुंबईतील अंधेरी येथील जमीन विकली आहे. तब्बल ८५५ कोटी रुपयांमध्ये त्यांनी एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्सना जमीन विकल्याची माहिती समोर आली आहे. स्क्वेअर यार्ड्सवरील मालमत्तेच्या नोंदणी कागदपत्रांनुसार, ही मालमत्ता कपूर कुटुंबाच्या मालकीच्या दोन कंपन्या, पॅन्थियन बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड आणि तुषार इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत विकण्यात आली.

या जमिनीच्या विक्रीच्या सौद्याची नोंदणी २९ मे २०२५ रोजी करण्यात आली. ९,६६४.६८ चौरस मीटर म्हणजेच सुमारे २.३९ एकर जमीन कपूर कुटुंबाने विकली आहे. कागदपत्रांवरील माहितीनुसार, या जागेवर सध्या बालाजी आयटी पार्क आहे आणि त्यात तीन इमारती आहेत. त्यावरील बांधकाम अंदाजे ४.९ लाख चौरस फूट आहे.

मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी ही जमीन खरेदी केली आहे. कंपनी क्लाउड सोल्यूशन्स, होस्टिंग, डेटा मॅनेजमेंट, सायबर सुरक्षा आणि अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट यासारख्या विविध तंत्रज्ञान सेवा पुरवते.

जमिनीच्या या व्यवहारासाठी ८.६९ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० नोंदणी शुल्क आकारण्यात आले, अशी माहिती कागदपत्रांवरून समोर आली आहे. पॅन्थियन बिल्डकॉन आणि तुषार इन्फ्रा डेव्हलपर्स या दोन्ही कंपन्या जितेंद्र कपूर आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या आहेत. ही जमीन मुंबईतील अंधेरी भागात आहे. अंधेरी हे मुंबईतील एक प्रमुख कमर्शिअल व रेसिडेन्शिअल हब आहे.

अलीकडच्या काळात इतर बॉलीवूडकरांनी केलेले मालमत्तेचे व्यवहार

मे महिन्यात अभिनेता जयदीप अहलावत व त्याची पत्नी ज्योती हुड्डा यांनी मुंबईतील अंधेरी भागात १० कोटी रुपयांमध्ये अपार्टमेंट विकत घेतले.

एप्रिल महिन्यात गायिका अल्का याज्ञिक व त्यांची मुलगी सायेशा कपूर यांनी अंधेरीत एक लक्झरी अपार्टमेंट घेतले. यासाठी त्यांनी ११.५ कोटी रुपये मोजले. हे अपार्टमेंट ओबेरॉय स्काय हाइट्स इमारतीत आहे.

संगीतकार व गायक अनु मलिक व त्यांची पत्नी अंजू मलिक यांनी त्यांचे मुंबईतील दोन अपार्टमेंट १४.४९ कोटी रुपयांना विकले. हे दोन्ही अपार्टमेंट सांताक्रूझ वेस्टमध्ये होते.

मागच्या वर्षी महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील अंधेरी भागात तीन व्यावसायिक मालमत्तांची खरेदी केली. त्यासाठी त्यांनी ६० कोटी रुपये मोजले होते.