Shefali Jariwala Net Worth: ‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालाचे निधन झाले आहे. ‘बिग बॉस’सह इतर अनेक टीव्ही शो, चित्रपट आणि रिअॅलिटी शोमध्ये झळकलेल्या शेफालीला हृदयविकाराचा झटका आला. तिला पती परागने मुंबईच्या बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (अंधेरी) येथे नेलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शेफालीच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

सिनेपत्रकार विकी लालवानीने शेफालीच्या निधनाची पोस्ट सर्वात आधी केली. शेफालीला तिचा पती पराग त्यागी आणि इतर तिघे जण रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयाच्या रिसेप्शन कर्मचाऱ्यांनी सांगितलं की शेफालीचा मृत्यू रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच झाला होता. शेफालीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शेफालीच्या निधनानंतर तिचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले. पराग त्यागीचा रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ समोर आला आहे.

१९ व्या वर्षी शेफालीला मिळाली प्रचंड लोकप्रियता

टीव्ही व सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी खूप लहान वयात प्रचंड लोकप्रियता मिळवली. याच लोकांपैकी शेफाली जरीवाला एक आहे. तिने अवघ्या १९ व्या वर्षी इंडस्ट्रीमध्ये ‘कांटा लगा’ या सुपरहिट म्युझिक व्हिडीओतून धमाकेदार एन्ट्री केली. या गाण्याने तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली. इतक्या वर्षांनंतर चाहते आजही तिला ‘कांटा लगा गर्ल’ या नावाने ओळखतात.

शेफालीचं इंडस्ट्रीतील करिअर

शेफालीने तिचे सुरुवातीचे शिक्षण अहमदाबाद येथून पूर्ण केले. त्यानंतर ती इंजिनिअरींगचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आली. मुंबईत आल्यावर तिला ‘कांटा लगा’ या गाण्यात काम करण्याची संधी मिळाली आणि तिचं नशीब पालटलं. या गाण्याच्या प्रचंड यशानंतर, शेफालीने अनेक प्रसिद्ध टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले. तिने ‘मुझसे शादी करोगी’ (२००४) आणि ‘हुडुगारू’ (२०११) सारख्या चित्रपटांमध्ये छोट्या पण दमदार भूमिका केल्या. तसेच तिने ‘बूगी वूगी’, ‘नच बलिये ५’, ‘नच बलिये ७’ आणि ‘बिग बॉस १३’ या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता.

शेफाली जरीवालाची संपत्ती

टाइम्स बुलच्या वृत्तानुसार, शेफाली जरीवालाकडे ७.५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिच्या उत्त्पन्नाचे स्रोत प्रामुख्याने शो, वेब सीरिज व जाहिरात होते. तसेच ती सोशल मीडियावर पेड प्रमोशन करून पैसे कमवायची.