Katrina Kaif Pregnancy News : मागील वर्षभरात दीपिका पादुकोण- रणवीर सिंह, राधिका आपटे, सिद्धार्थ मल्होत्रा- कियारा अडवाणीसह अनेक कलाकारांनी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. आता बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडपं कतरिना कैफ व विकी कौशल आई-बाबा होणार असल्याचं म्हटलं जातंय. लग्नानंतर चार वर्षांनी त्यांच्या घरी चिमुकला सदस्य येणार, असे वृत्त आहे.

४२ वर्षांची कतरिना कैफ गरोदर आहे. त्यामुळेच ती बाहेर इव्हेंट्सला जाणं टाळतेय. प्रसूतीनंतर ती अभिनयातून काही काळ ब्रेक घेणार आहे, असंही म्हटलं जात आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने कतरिना कैफ गरोदर असल्याचे वृत्त दिले आहे.

लग्नाच्या चार वर्षांनंतर कतरिना कैफ आणि विकी कौशल आई- बाबा होणार आहेत, असा दावा एनडीटीव्हीच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. कतरिना आणि विकी या वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करतील. यानंतर, कतरिना तिच्या बाळाकडे पूर्ण लक्ष देण्यासाठी कामातून मोठा ब्रेक घेणार आहे, असंही म्हटलं जातंय.

कतरिना कैफ गरोदर आहे, अशा बातम्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेकदा विकी व कतरिना लवकरच पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत, अशा बातम्या आल्या होत्या. पण विकीने या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. बॅड न्यूज सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी विकी कौशल म्हणालेला, “आनंदाची बातमी असेल तेव्हा ती तुम्हा सर्वांबरोबर शेअर करायला आम्हाला नक्कीच आनदं होईल. पण आता या अफवांमध्ये काहीच सत्य नाही. गुड न्यूज असेल तेव्हा आम्ही स्वतःच तुम्हाला सांगू.”

२०२१ मध्ये कतरिना-विकीने केलं लग्न

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी २०२१ मध्ये राजस्थानमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले होते. त्यांच्या लग्नाला फक्त कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. या जोडप्याने इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता लग्नानंतर चार वर्षांनी हे दोघेही आई-बाबा होणार असं म्हटलं जात आहे. दरम्यान, कतरिना किंवा विकी दोघांनीही अद्याप या बातमीची पुष्टी केलेली नाही. त्यामुळे यंदा कौशल कुटुंबात चिमुकला सदस्य येणार की नाही, हे त्यांनी माहिती दिल्यावरच कळेल.