Abhinav Kashyap on Salman Khan and Family: सलमान खानचे अनेक चित्रपट गाजले. त्यात २०१० साली प्रदर्शित झालेला दबंग हा चित्रपटदेखील आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनव कश्यपने केले होते.
आता ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनव कश्यपने सलमान खान व संपूर्ण कुटुंबावर अनेक आरोप केले आहेत. अभिनव कश्यप म्हणाला, “सलमान खान व त्याच्या कुटुंबानं त्यांनी न केलेल्या गोष्टींचं श्रेय घेतलं. तो चित्रपट त्यांच्या करिअरमधील महत्त्वाचा चित्रपट होता. त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टींचं श्रेय घेण्याची गरज वाटली. यश मिळालं की, त्याचं श्रेय घेण्यासाठी अनेक जण येतात; अपयशाला कोणीही वाली नसतो.”
मला ‘दबंग’मधून बाहेर काढण्यात आलं. मला कोणत्याही गोष्टीचं श्रेय देण्यात आलं नाही. अरबाजला संपूर्ण यशाचं श्रेय मिळावं म्हणून खान कुटुंबानं हा प्रयत्न केला असावा, असं मला वाटतं.”
अभिनवला चित्रपटाचं कोणतंही श्रेय दिलं गेलं नाही, याबाबत त्यानं विरोध का केला नाही? यावर उत्तर देताना अभिनव कश्यप म्हणाला, “जेव्हा मी चित्रपट तयार केला, त्यावेळी त्यांना जाणवलं की, या चित्रपटाला यश मिळणार आहे. त्यानंतर त्याचं श्रेय सगळ्यांनाच हवं होतं. जेव्हा चित्रपटाचं मार्केटिंग सुरू झालं, तेव्हा मला चित्रपटातून बाहेर काढलं गेलं. मी चित्रपट बनवण्याचं स्वप्न पाहिलं, तो मी बनवला आणि त्यानंतर मला बाजूला केलं.”
“त्यावेळी भांडण्यात काय अर्थ होता? त्यांनी चित्रपटातून बाहेर काढण्यासाठी खूप छोट्या छोट्या गोष्टी केल्या. मी खूप लहान होतो, माझा पहिला चित्रपट होता. त्या चित्रपटातून शांतपणे बाहेर पडणं माझ्यासाठी ठीक होतं.”
अरबाज निर्माता म्हणून पुढे येण्याची संधी त्याला दंबगमधून मिळाली. त्यांनी माझ्यापुढे अट ठेवली होती की जर अरबाज निर्माता म्हणून काम करेल, त्याला मी होकार दिला होता.
चित्रपटाचा सिक्वेल ‘दबंग २’ अरबाजने दिग्दर्शित केला होता आणि दिलीप शुक्ला यांनी पटकथा लिहिली होती. याबद्दल बोलताना अभिनव म्हणाला, ” ‘दबंग २’च्या वेळी मला त्यांनी त्रास दिला. आमच्यात मतभेद झाले आणि मला त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केल्यानंतर मी त्या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना एका गुलामासारखा दिग्दर्शक हवा होता. त्यांनी जे करायला सांगितलं, ते मी करावं, असं त्यांना वाटत होतं; पण मला माहीत होतं की, ते माझ्या सर्जनशीलतेचा फायदा घेतील, श्रेय चोरतील व पैसे कमवतील. मला हे ‘दबंग’ चित्रपटाच्या वेळीच समजले होते. मला आदर, प्रसिद्धी , पैसा , श्रेय मिळणार नाही, हे मला माहीत होतं.”
अभिनव कश्यपने असेही सांगितले की, मी त्यांना पुन्हा भेटलो नाही. कारण- मला पार्टीला वगैरे जायला आवडत नाही. एकदा एका स्टुडिओमध्ये सलमान खान आला होता. त्याच्या ‘एक था टायगर’ चित्रपटासाठी तो डबिंग करायला आला होता. मीदेखील तिथे होतो; पण मी त्याला भेटण्यासाठी गेलो नाही.
दिग्दर्शकाने असेही सांगितले की, रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या बेशरम या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला नाही. त्या चित्रपटाला अपयश मिळालं आणि त्याचं श्रेय मात्र मला दिलं गेले. कपूर कुटुंबानं त्यासाठी मला जबाबदार ठरवलं.