Kishore Kumar’s wife Leena Chandavarkar recalled his eccentricities: किशोर कुमार हे त्यांच्या गाण्यांसाठी ओळखले जातात. तसेच, अभिनेता म्हणूनदेखील त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती. याशिवाय त्यांच्या विचित्र स्वभावाबाबत अनेकदा बोलले जाते.
किशोर कुमार यांची चौथी पत्नी अभिनेत्री लीना चंदावरकर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या विचित्र स्वभावाबाबत सांगितले होते. त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी किशोर कुमार यांना सोडून देण्याचा विचार केला होता, असे वक्तव्य केले होते. लीना चंदावरकर यांनी लेहरेन रेट्रोला मुलाखत दिली होती.
“ते कधीकधी खूप…”
या मुलाखतीत त्या म्हणालेल्या, “कोणी त्यांना वेडे म्हणाले तर त्यांना ते आवडायचे नाही. त्यांच्या वागण्यात सतत बदल होत असत. ते कधीकधी खूप गंभीर व्हायचे तर कधीकधी ते बालिश वागायचे. कोणत्या वेळी ते काय वागतील, काय करतील, याचा काहीच अंदाज येत नसे.”
किशोर कुमार यांच्या त्यावेळच्या मनस्थितीबद्दल तसेच त्यांच्या बदललेल्या वागण्याबद्दल लीना चंदावरकर म्हणालेल्या, “एकदा त्यांनी मला विचारलेले की, तू माझ्याबद्दल काही अफवा ऐकल्या आहेस का? त्यावर मी नकार दिला, कारण मला त्यांच्या तोंडावर काही सांगायचे नव्हते. त्यावेळी मी खोलीत एकटीच होते. प्यार अजनबी हैं या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, मी मेकअप करत होते. जेव्हा मी त्यांना सांगितले की, मी त्यांच्याबद्दल काही ऐकले नाही, त्यावेळी त्यांनी असा चेहरा केला होता जो मी आता करू शकत नाही. पण, त्यांनी एखाद्या प्राण्यासारखा चेहरा केला होता. त्यांच्याकडे पाहून खूप भीती वाटत होती. त्यांच्याकडे पाहून असे वाटत होते की ते वेडे झाले आहेत.
मी त्यांच्याबद्दल अशा गोष्टी ऐकल्या होत्या, त्यामुळे मला खूप भीती वाटत होती. मी माझ्या हेअर ड्रेसरला शोधू लागले. मला हे मान्य करावे लागले की मी त्यांच्याबद्दल अफवा ऐकल्या आहेत. त्यानंतर त्यांनी हसायला सुरूवात केली. मला विचारले की तू मला याआधी का सांगितलं नाहीस?
लीना चंदावरकर पुढे असेही म्हणाल्या, “ते मुलांबरोबर हॉरर चित्रपटदेखील बघत असत. तो त्यांचा स्वभाव होता. आमच्या लग्नानंतर ते खूप बदलले. नवरा आणि बायकोमध्ये अनेकदा भांडणे होत असतात. तुम्ही उशिरा का आलात? कोणत्या महिलेने तुम्हाला बोलावले होते? अशा गोष्टी आमच्यात होत असत आणि मला खूप असुरक्षित वाटत असे. कारण मी त्यांची चौथी पत्नी होते. त्यांनी पाचवे लग्न करू नये असे मला वाटत होते.”
“मला खूप तणाव येत असे. एकदा मी त्यांना सांगितले की मी घर सोडत आहे, ते थोडे घाबरले, पण नंतर ते मला म्हणाले की तू निघून जा, कधीही परत येऊ नकोस आणि माझ्याशी पुन्हा कधीही बोलू नकोस. मी जात होते तेव्हा त्यांचे मित्र आले आणि त्यांनी मला जाण्यापासून थांबवले.”
किशोर कुमार यांची चार लग्न झाली होती. त्यांची पहिली पत्नी बंगाली गायिका आणि अभिनेत्री रूमा गुहा ठाकुरता होती, ज्यांना रूमा घोष म्हणूनही ओळखले जाते. त्यांचे लग्न आठ वर्षे टिकले. त्यानंतर त्यांनी मधुबालाशी लग्न केले, परंतु अभिनेत्री लवकरच आजारी पडली आणि १९६९ मध्ये मधुबालाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री योगिता बालीशी यांच्याशी लग्न केले, परंतु हे लग्नदेखील फक्त दोन वर्षे टिकले. लीना चंदावरकर या किशोर कुमार यांच्या चौथ्या पत्नी होत्या.