Box Office collection of new release movies: जुलै महिन्यात अनेक बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यामध्ये मेट्रो इन दिनों, कालीधर लापता, ‘आँखो की गुस्ताखियां’, तसेच राजकुमार रावचा ‘मालिक’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. बॉलीवूडसह काही हॉलीवूड चित्रपटदेखील प्रदर्शित झाले आहेत.

राजकुमार रावने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यामध्ये ‘स्त्री’, ‘मिस्टर अँड मिसेस माही’, ‘श्रीकांत’, ‘भीड’ अशा अनेक चित्रपटांत तो प्रमुख भूमिकेत दिसला आहे. नुकताच ११ जुलै राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेला मालिक हा सिनेमा चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत. राजकुमार राव एक वेगळ्याच रूपातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट पुलकित यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यामध्ये मानुषी छिल्लर, सौरभ शुक्ला, प्रसेनजीत चटर्जी, स्वानंद किरकिरे, सौरभ सचदेव हे कलाकार प्रमुख भूमिकांतून दिसत आहेत. आता या चित्रपटाने पहिल्याच दिवशी किती कमाई केली आहे, हे जाणून घेऊ…

कोणत्या चित्रपटांनी किती केली कमाई

‘सॅल्कनिक’नुसार या चित्रपटाने ३.३५ कोटींची पहिल्या दिवशी कमाई केली आहे. आता राजकुमार रावच्या याआधीच्या चित्रपटांपेक्षा हे कलेक्शन कमी आहे. अभिनेत्याच्या ‘भूल चूक माफ’ने पहिल्या दिवशी सात कोटींची कमाई केली होती. त्याबरोबरच जॉन अब्राहमच्या ‘द डिप्लोमॅट’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी चार कोटींची कमाई केली होती.

आता ११ जुलैलाच विक्रांत मेस्सी व शनाया कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘आँखो की गुस्ताखियां’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त ३२ लाखांची कमाई केली आहे. शनाया कपूरचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाच्या तुलनेत राजकुमारच्या रावच्या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

त्याबरोबरच सध्या चित्रपटगृहांत बहुचर्चित ‘मेट्रो इन दिनों’देखील आहे. त्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. ४ जुलैला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने २९ कोटी इतकी कमाई केली आहे. हॉलीवूडचा ‘जुरासिक वर्ल्ड रिबर्थ’ने आतापर्यंत एकूण ५८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्याबरोबरच या आठवड्यात हॉलीवूडचा ‘सुपरमॅन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी सात कोटींची कमाई केली. त्यामुळे राजकुमार रावच्या मालिक या चित्रपटाला मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, ‘मालिक’ चित्रपटाचे बजेट ५४ कोटी असल्याचे म्हटले जात आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.