Madhuri Dixit Choli Ke Peeche Kya Hai Song : आपलं सौंदर्य व उत्तम नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या माधुरीने ९० च्या दशकात बॉलीवूडवर राज्य केलं. तिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. माधुरीबरोबर काम करणं हे त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांचं स्वप्न असायचं. माधुरीच्या अभिनयाबरोबरच तिच्या नृत्याची सर्वाधिक चर्चा होते.

माधुरीने तिच्या करिअरमध्ये बरीच सुपरहिट गाणी दिली. पण तिचं एक गाणं इतकं वादग्रस्त ठरलं होतं की त्या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती. ही गोष्ट १९९३ च्या सुपरहिट चित्रपट ‘खलनायक’ मधील ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्याची आहे.

सुभाष घई दिग्दर्शित ‘खलनायक’ मध्ये संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. फक्त ४ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २१ कोटी रुपयांची कमाई केली होती. पण अलका याज्ञिक आणि इला अरुण यांनी गायलेलं ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणं वादात सापडलं होतं.

गाण्यावर आक्षेप अन् बंदीची मागणी

‘चोली के पीछे क्या है’ हे गाणं, त्यातील शब्द, त्यावर बसवलेला माधुरीचा डान्स या सगळ्यांवरच लोकांनी आक्षेप घेतला होता. या गाण्यातील माधुरी दीक्षितचे हावभाव, देहबोली यावर बऱ्याच लोकांनी टीका केली. अनेकांनी गाण्याचे बोल अश्लील आहेत, गाणं आक्षेपार्ह आहे, अशी टीका केली. विरोध इतका वाढला की प्रकरण न्यायालयात पोहोचलं. तक्रारदारांनी सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातून हे गाणं काढून टाकावं आणि सर्व विकल्या गेलेल्या कॅसेट परत मागवाव्यात अशी मागणी केली होती.

चोली के पीछे क्या है गाण्यातील माधुरीचा फोटो (सौजन्य- स्क्रीनशॉट)

न्यायालयाने सुनावणीनंतर गाण्यात काहीही आक्षेपार्ह नाही, असा निर्णय दिला. पण तरीही हा वाद काही कमी झाला नाही. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनी गाण्यात काहीही आक्षेपार्ह नाही आणि हा विरोध थांबायला हवा, असं म्हटलं. त्यानंतर विरोध थोडा कमी झाला. मात्र तरीही, दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओने या गाण्यावर बंदी घातली, परिणामी या गाण्याचे टीव्ही आणि रेडिओवरील प्रसारण थांबले.

गीतकार आनंद बक्षी काय म्हणाले होते?

एका मुलाखातीदरम्यान ‘चोली के पीछे क्या है’ चे गीतकार आनंद बक्षी यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली होती. “यात काय अश्लील आहे? हे एक राजस्थानी लोकगीत आहे. तिथल्या लग्नात अशी गाणी वाजतात. तुमचं हृदय हेच ‘चोली’मध्येच असणार, जर तुम्ही शर्ट परिधान केला असेल तर तुमचं मन किंवा हृदय हे त्याच्या आतच असणार. अशी बरीच पंजाबी गाणी आहेत, ज्याचा हिंदीत अर्थ जाणून घ्यायला गेलं तर ती खूप अश्लील वाटतील पण वास्तविक ती तशी नाहीत,” असं बक्षी यांनी म्हटलं होतं.

‘चोली के पीछे क्या है’ हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की २०२४ मध्ये करीना कपूर, तब्बू आणि कृती सॅनन यांच्या ‘क्रू’ चित्रपटासाठी ते पुन्हा वापरण्यात आलं. या सिनेमात बॅकग्राउंड म्युझिक म्हणून गाणं वापरलं गेलं. सिनेमात हे गाणं चपखल बसलं, त्यामुळे प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं होतं.