माधुरी दीक्षितने १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेनेंशी लग्नगाठ बांधली. त्यावेळी ‘धकधक गर्ल’ बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. करिअरच्या शिखरावर असताना माधुरीने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. पण, तुम्हाला माहिती आहे का? तिचे पती डॉ. श्रीराम नेनेंना सुरुवातीला सिनेविश्वातील अभिनेत्रीशी लग्न करायचं नव्हतं. कारण, त्यांचं बालपण लॉस एंजेलिसमध्येमध्ये गेलं होतं आणि पुढे हार्ट सर्जन झाल्यावर अनेक हॉलीवूड सेलिब्रिटींना ते प्रत्यक्ष भेटले होते, त्यांच्या संपर्कात होते.

डॉ. नेने यांचं हॉलीवूड कलाकारांबद्दलचं मत फारसं चांगलं नव्हतं. त्यामुळे इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अभिनेत्रीशी लग्न करायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. मात्र, माधुरीच्या भावाला अन् त्यानंतर प्रत्यक्ष तिला भेटल्यावर त्यांचा विचार बदलला. याबद्दल डॉ. नेनेंनी ‘गुगल फायरसाईड’शी संवाद साधताना उलगडा केला होता.

डॉ. नेने म्हणाले, “माझं कुटुंब आधी मुंबईत राहायचं. त्यानंतर माझे वडील कामानिमित्त बाहेरगावी आले. यामुळेच आमच्या घरी मराठी बोललं जायचं पण, मला हिंदी येत नव्हतं. कारण, आम्ही लहानपणापासून कधीच हिंदी चित्रपट कधीच पाहिले नव्हते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मी UCLA ( युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस ) मध्ये होतो तेव्हा, बरेच हॉलीवूड सेलिब्रिटी माझे पेशंट होते. हॉलीवूड इंटस्ट्री खूप जास्त क्रेझी आहे हे मी स्पष्टपणे सांगतो आणि त्यामुळेच मला या क्षेत्रातील मुलीशी लग्न करायचं नव्हतं. पण, घरी लग्नाचा विचार सुरू झाल्यावर मी माधुरीच्या भावाला भेटलो. त्याचा साधेपणा, त्याची मानसिकता सगळं काही आमच्या कुटुंबाला साजेसं होतं आणि म्हणूनच मी माधुरीला भेटायला तयार झालो…आणि त्यानंतरच मी पहिल्यांदा तिचं नाव गुगल केलं, ती नेमकी कोण आहे याबद्दल जाणून घेतलं.”

डॉ. नेने पुढे म्हणाले, “माधुरीला पहिल्यांदा पाहिल्यावर मला काय बोलावं हे सुचत नव्हतं. प्रचंड शांत, अजिबात कसलाच गर्व नव्हता. मोठेपणा नाही…माणुसकीला खूपच चांगली आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तिचा स्वभाव खूप शांत पहिल्यापासूनच आहे. आमचे विचार एकमेकांशी जुळले. माधुरीचा तिच्या करिअरवर पूर्णपणे फोकस होता. फिल्मी क्षेत्रात काम करूनही तिच्यातलं माणूसपण तिने जपलं होतं आणि म्हणूनच आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. तिचा स्वभाव मला प्रचंड भावला.”

माधुरी व डॉ. नेने एकमेकांना भेटले, पुढे त्यांच्यात छान मैत्री झाली अन् या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन या जोडप्याने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. १९९९ मध्ये या दोघांचा लग्नसोहळा अमेरिकेत पार पडला होता. काही वर्षांनी म्हणजेच २०११ मध्ये डॉ. नेने व माधुरी मायदेशी परतले.