माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांचा जन्म लंडनमध्ये झाला. मात्र, काही वर्षांनी डॉ. नेने व कुटुंबीय अमेरिकेत राहायला आले, याचठिकाणी त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर १९९९ मध्ये त्यांनी बॉलीवूडची स्टार अभिनेत्री माधुरी दीक्षितशी लग्न केलं. अमेरिकेत अनेक वर्षे राहिल्यावर कालांतराने या दोघांनीही भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
डॉ. श्रीराम नेनेंनी त्यांची अमेरिकेतील हार्ट सर्जनची नोकरी सोडून भारतात येण्याचं ठरवलं, तेव्हा त्यांचे आई-बाबा प्रचंड नाराज झाले होते. माधुरीच्या सासू-सासऱ्यांची नावं अनु नेने व माधव नेने अशी आहेत. हे दोघंही उच्चशिक्षित आहेत त्यामुळे, डॉ. श्रीराम नेनेंनी सुद्धा इंजिनीअर अथवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करावं अशी त्यांच्या आई-बाबांची मनापासून इच्छा होती…आणि ती इच्छा पूर्ण देखील झाली. याबद्दल, माधुरीच्या नवऱ्याने स्वत: खुलासा केला आहे. ते INKtalks च्या पॅनलवर बोलत होते.
डॉ. नेने सांगतात, “वयाच्या १४ व्या वर्षी मी माझा उद्योजक म्हणून प्रवास सुरू केला होता. पण, जसजसा मोठा झालो तसं पालकांनी अभियंता किंवा डॉक्टर होण्यास सांगितलं. जर तू डॉक्टर किंवा इंजिनीअर झाला नाहीस, तर तुझ्या शिक्षणासाठी आम्ही खर्च करणार नाही, पैसे देणार नाही असं माझ्या पालकांनी मला सांगितलं होतं. माझे आई-बाबा साहजिकच आधीच्या पिढीतील असल्याने त्यांची विचारसरणी त्यावेळी थोडी वेगळी होती.”
डॉ. नेने पुढे म्हणाले, “मी त्या क्षणाला खूप कर्तव्यदक्ष राहिलो. स्टॅनफोर्ड किंवा बर्कलेला न जाता मी वॉशिंग्टन विद्यापीठात अंडरग्रॅजुएट मेडिसिन प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला. त्याठिकाणी शिक्षण पूर्ण करून, UCLA ( युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया ) मध्ये प्रवेश घेतला. UCLA मध्ये मी माझं जनरल आणि व्हॅस्क्युलर सर्जरीचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे, मग फ्लोरिडा विद्यापीठात मी प्रॅक्टिस सुरू केली.”
यानंतर डॉ. श्रीराम नेनेंनी अमेरिकेत अनेक वर्षे काम केलं. मात्र, काही वर्षांनी त्यांनी हार्ट सर्जनची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. परदेशातील नोकरी सोडून त्यांनी वैद्यकीय सल्लागार व उद्योजक म्हणून काम करण्यास सुरुवात केली, ते २०११ मध्ये भारतात आले. हा निर्णय त्यांच्या आई-वडिलांना म्हणजे माधुरीच्या सासू-सासऱ्यांना पटला नव्हता.
“२०११ मध्ये जेव्हा मी नोकरी सोडली तेव्हा माझे सहकारी नाराज झाले होते. मी क्लिनिकल हार्ट सर्जन म्हणून माझी नोकरी सोडली होती आणि त्यानंतर सर्वत्र नाराजीचा सूर होता. ‘तुम्ही काय करत आहात? आम्हाला तुमची इथे गरज आहे’ असं माझे सहकारी सतत सांगत होते. माझे कर्मचारी निराश झाले होते. माझे पालक या निर्णयापासून अजिबात खूश नव्हते. पण, हळुहळू मी आता जे-जे काही करतोय ते पाहून त्यांना हा निर्णय पटलेला आहे.” असं डॉ. नेनेंनी सांगितलं.