Madhuri Dixits Revealed Her Sons Reaction on Her Acting: बॉलीवूडची धकधक गर्ल गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. तिच्या चित्रपटांबद्दल, तिच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा होताना दिसत आहे. माधुरी दीक्षितच्या पतीने एका मुलाखतीत माधुरीबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
१९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ या चित्रपटातून माधुरी दीक्षितने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने स्वाती, उत्तर दक्षिण, दयावान, परिंदा, तेजाब, राम लखन अशा अनेक चित्रपटांतून तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. प्रेम प्रतिज्ञा, प्रहार:द फायनल अटॅक अशा चित्रपटांतून अभिनेत्री लोकप्रिय ठरली. तिने वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. अभिनयाबरोबरच तिच्या नृत्यासाठीदेखील माधुरी दीक्षितचे कौतुक झाले.
माधुरी दीक्षितने डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी १९९९ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर ती अमेरिकेला गेली. त्यांना दोन मुलेदेखील आहेत. अरीन व रायन अशी त्यांची नावे आहेत. एनडीटीव्हीला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत माधुरी दीक्षितने अमेरिकेला गेल्यानंतर सुरुवातीला तिला अस्वस्थ वाटत होते असे वक्तव्य केले.
त्यावेळी मला कोणीतरी ओळखले पाहिजे…
माधुरी दीक्षित म्हणाली होती, “भारतीय सगळीकडे आहेत. जेव्हा मी काही साहित्य खरेदी करण्यासाठी जायचे, भाजी खरेदी करण्यासाठी जायचे, तिथे मला भारतीय भेटायचे. ते मला ओळखायचे. ते माझ्याशी खूप छान पद्धतीने वागायचे. ते मला फक्त सांगायचे की आम्हाला तुमचे चित्रपट आवडतात. ते माझ्या खासगीपणाचा आदर करायचे.”
पण, काही वेळा मला भीती वाटायची, कारण मी तिथे गाडी चालवायला सुरू केली होती. मला पत्ता शोधण्यासाठी अडचण यायची, कारण हे मी भारतात कधीही केले नव्हते. भारतात असताना मी ड्रायव्हरला ठिकाण सांगायचे आणि तो मला त्या ठिकाणी नेऊन सोडायचा. पण, अमेरिकेत मला माझे रस्ते स्वत:ला शोधायला लागायचे, त्यावेळी मला कोणीतरी ओळखले पाहिजे आणि त्यांनी मला तू चुकीच्या दिशेन जात आहेस, असं सांगायला पाहिजे, अशी आशा करायचे.
याच मुलाखतीत माधुरीच्या पतीने श्रीराम नेनेंनी सांगितले होते की, लग्नाआधी चित्रपट क्षेत्राबद्दल माहीत होते. मात्र, माधुरीचे काम तितके पाहिले नव्हते. माधुरीला कुटुंबाबरोबर तिचे स्वत:चे चित्रपट पाहणे अवघडल्यासारखे व्हायचे, त्यामुळे लग्नानंतरही त्यांनी तिचे फारसे काम पाहिले नाही.
परत आल्यानंतर मला…
माधुरीने तिच्या मुलांचा किस्सा सांगत म्हटले होते की, माझी मुले माझे चित्रपट पाहताना थोडे घाबरतात. ते टीव्हीवर कोयला हा चित्रपट बघत होते. माझी मुले ‘भांग के नशे में’ हे गाणे पाहात होते, ज्यात मी जास्त नशेत असल्याचा अभिनय करते. ते पाहिल्यानंतर मी तिथून निघून गेले. परत आल्यानंतर मला कॉम्युटरवर एक कागद दिसला. त्यावर लिहिले होते की, “प्रिय आई, तू चित्रपटात इतका विचित्र अभिनय का करत होतीस?”
श्रीराम नेनेंनी सांगितले की, त्यांच्या घरात नियम आहेत. माधुरी तिचे स्टारडम घेऊन घरी येत नाही. तिचे सगळे पुरस्कार आणि इतर गोष्टी ऑफिसमध्ये आहेत. तिच्या स्टारडमचा परिणाम आमच्या मुलांवर अथवा आमच्यावर होऊ नये, असा त्यामागचा माधुरीचा विचार आहे. मी तिच्या काही चित्रपटांच्या प्रीमिअरला हजेरी लावली आहे. मात्र, कुटुंबाबरोबर चित्रपट पाहणे तिला अवघडल्यासारखे वाटते.
दरम्यान, माधुरी दीक्षित नुकतीच भुल भुलैय्या ३ मध्ये दिसली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच प्रसिद्धी मिळाल्याचे पाहायला मिळाले.