Happy Birthday Asha Bhosle : भारतीय सिनेसृष्टीला लाभलेल्या दिग्गज गायिका म्हणून आशा भोसले यांना ओळखलं जातं. त्यांच्या सुमधूर आवाजाची जादू कायमच श्रोत्यांना भुरळ घालते. ८०-९० च्या दशकातील अनेक सुपरहिट गाणी त्यांनी गायलेली आहेत. यामध्ये ‘दम मारो दम’, ‘एक मैं और एक तू’, ‘शरारा’, ‘राधा कैसे ना जले’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘चंद्र आहे साक्षीला’ अशा असंख्य गाण्यांचा समावेश आहे. आज या दिग्गज गायिकेचा ९२ वा वाढदिवस आहे. संपूर्ण मनोरंजन विश्वातून आज आशा भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
बॉलीवूडची स्टार अभिनेत्री माधुरी दीक्षितने आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
माधुरी दीक्षित पोस्ट शेअर करत लिहिते, “आज आपण फक्त वाढदिवस नव्हे तर पिढ्यानपिढ्या असंख्य श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञीचा खास दिवस साजरा करत आहोत. तुमचा आवाज हा रसिक प्रेक्षकांच्या जीवनातील प्रेम, आनंद, आठवणी आणि त्यामागच्या भावना जागृत करणारा एक साउंडट्रॅक आहे.”
माधुरी पुढे म्हणते, “शास्त्रीय संगीतापासून अलीकडच्या काळातील उडती गाणी गाण्याचा अनोखा प्रयोग तुम्हीच यशस्वी करू शकलात. तुम्ही सर्वांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान आहात आणि आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहात. तुमचा हा प्रवास पॅशन आणि तुमच्या संगीतप्रेमाचा पुरावा आहे.”
“वयाच्या ९२ व्या वर्षी तुम्हाला खूप प्रेम, उत्तम आरोग्य लाभो. रंगमंचावर तुमचं गाणं आणि आमच्या हृदयात तुमच्याविषयीचं प्रेम कायम राहणार….खूप आदर आणि कृतज्ञता… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आशा ताई!” अशी पोस्ट शेअर करत माधुरीने आशा भोसले यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘परिंदा’ सिनेमात माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यामधील ‘तुमसे मिलके’ हे गाणं आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. हे गाणं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलं आहे. याशिवाय आशा ताईंनी माधुरीच्या चित्रपटांसाठी ‘पहेली पहेली बार जब’, ‘चिठ्ठी मुझे लिखना’ अशी अनेक गाणी गायली आहेत.