Madhuri Dixit’s Village in Kokan Devgad : मराठी सिनेविश्वातील प्रसाद खांडेकर, अंशुमन विचारे, निखिल बने, संतोष जुवेकर, ऐश्वर्या नारकर, तितीक्षा व खुशबू तावडे असे बरेच कलाकार मूळचे कोकणातले आहेत. गौरी-गणपतीच्या सणाला आणि शिमगोत्सवाला हे कलाकार आवर्जून गावी जातात. गावच्या घराची, कोकणातील संस्कृतीची झलक या कलाकारांनी शेअर केलेल्या फोटो अन् व्हिडीओजमध्ये चाहत्यांना पाहायला मिळते. पण, तुम्हाला माहितीये का? बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या माधुरी दीक्षितचं गाव सुद्धा कोकणात आहे.

माधुरी दीक्षितचं गाव कोकणातील देवगड तालुक्यात ‘पडेल’ याठिकाणी आहे. राहिद सोलकर या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने नुकतीच अभिनेत्रीच्या गावी भेट दिली. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी राहिदने माधुरीचे चुलत भाऊ विकास दीक्षित यांची मुलाखत घेतली. त्यांनी ‘धकधक गर्ल’चं गावचं घर आणि तिच्या आजोबांबद्दल माहिती सांगितली.

विकास दीक्षित ( माधुरीचे चुलतभाऊ ) म्हणतात, “आमच्या गावाचं नाव आहे पडेल. आमचा तालुका देवगड आणि जिल्हा सिंधुदुर्ग. १९५० मध्ये माधुरीचे आजोबा रामचंद्र दीक्षित यांचं इथे घर होतं. ते इथून मुंबईला व्यवसायानिमित्त गेले होते. तिकडे ते शेअर ब्रोकर म्हणून काम करायचे. त्यानंतर त्यांनी दादरला शिवाजी पार्कच्या समोर घर घेतलं. आजही त्याठिकाणी दीक्षित बंगला आहे. त्या बंगल्यातच माधुरीचा जन्म झाला. रामभाऊंचे चिरंजीव शंकर यांची माधुरी ही मुलगी आहे.”

“लहानपणी ती आई-वडिलांबरोबर गावी यायची. पण, त्यानंतर सिनेविश्वात एन्ट्री घेतल्यावर तिला गावी यायला वेळ मिळायचा नाही. आता बरीच वर्षे ती गावी आलेली नाहीये पण, तिचे आई-वडील होते तेव्हा ते गावी यायचे. आमची माधुरी सुपरस्टार झाली याचा आम्हाला खूप-खूप अभिमान आहे. आमच्या कोकणाचं नाव तिने मोठं केलं. माधुरीचं आजोळ ( अभिनेत्रीच्या आईचं माहेर ) रत्नागिरीत आहे. ती माझी चुलत बहीण आहे.” असं विकास दीक्षित यांनी सांगितलं.

दरम्यान, माधुरीने निर्मिती केलेल्या ‘पंचक’ सिनेमाचं शूटिंग कोकणात झालं होतं. यावेळी अभिनेत्रीने तिच्या गावच्या आठवणी चाहत्यांबरोबर शेअर केल्या होत्या. अभिनेत्री म्हणाली होती, “माझी आजी-पणजी सगळे कोकणामध्ये होते. त्यामुळे आम्ही लहानपणी त्यांना भेटायला कोकणात जायचो. माझ्याबरोबर माझी चुलत भावंडं सुद्धा गावी यायची. मजा करायची, सगळ्यांनी एकत्र आंबे-फणस खायचे…या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्या आहेत.”