Mahesh Bhatt Once Warned Sanjay Leela Bhansali : संजय लीला भन्साळी बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. आजवर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या सिनेमात काम करण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक असतात. अभिनेत्री आलिया भट्टने त्यांच्याबरोबर ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात काम केलेलं. त्यानंतर आता ती त्यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या आगामी चित्रपटातून झळकणार आहे. अशातच आता दिग्दर्शक महेश भट्ट यांनी संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल सांगितलं आहे.
आलिया भट्टने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं; परंतु त्यापूर्वीच ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘बालिका वधू’ या चित्रपटातून पदार्पण करणार होती. त्यामध्ये ती रणबीर कपूरबरोबर झळकणार होती. तेव्हा आलिया भट्ट वयानंही लहान होती. मात्र, हा चित्रपट काही बनला नाही. अशातच आता तिचे वडील व दिग्दर्शक महेश भट्ट यांनी याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं आहे.
‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल महेश भट्ट म्हणाले, “तिला अभिनेत्री व्हायचं आहे याबद्दल तिनं मला कधीच सांगितलं नाही. याची चर्चा फक्त तिच्यामध्ये व तिच्या आईमध्येच व्हायची. एकदा त्यांनी एका चित्रपटाची ऑफर स्वीकारलेली, ज्याचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करणार होता. मला आठवतं की, संजय मला भेटायला आलेला. मी त्याला सांगितलेलं की, मला कळत नाहीये की, तू यासाठी माझ्याकडे परवानगी मागायला का आला आहेस. जोपर्यंत याचा तिच्या शाळेवर काही परिणाम होत नाही तोवर मला काही हरकत नाहीये. कारण- पालक म्हणून तिनं निदान इतपत शिकावं की, ज्याचा तिला पुढे आयुष्यात उपयोग होईल हे पाहणं ही आमची जबाबदारी आहे.”
महेश भट्ट यांनी संजय लीला भन्साळींना दिलेली ताकीद
महेश भट्ट पुढे म्हणाले, “चित्रपट बनवताना त्याबद्दल उत्सुकता, आवड असायला हवी. मी त्याला सांगितलं की, मी अशी आशा करतो की, तू काम उत्तम व्हावं म्हणून त्या लहानशा मुलीकडून जास्त अपेक्षा ठेवणार नाहीस. कारण- पालक म्हणून मला याबद्दल काळजी वाटते. त्यावर तो म्हणाला की, मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचं आहे.” संजय लीला भन्साळी कामाच्या बाबतीत खूप कडक शिस्तीचे असल्याचे काही कलाकार सांगताना दिसतात. माध्यमांच्या वृत्तानुसार रणबीर कपूरनंही त्यांच्याबरोबर एका चित्रपटात काम करतानाचा अनुभव सांगताना ते खूप तापट स्वभावाचे आहेत आणि परत कधीच त्यांच्याबरोबर काम करणार नाही, असं म्हटलेलं. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी रणबीर आता त्यांच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्ये काम करीत आहे.
दरम्यान, आलियानं करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून नवोदित सिद्धार्थ मल्होत्रा व वरुण धवन यांच्याबरोबर काम केलं. आज तिघेही बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी आहेत. आलिया भट्टचं अनेकदा तिच्या कामासाठी अनेकांकडून कौतुक होतं. ती शेवटची ‘जिगरा’ या चित्रपटात झळकलेली. परंतु, त्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही. त्यानंतर आता ती यशराज प्रॉडक्शनच्या ‘अल्फा’ या चित्रपटातून झळकणार आहे.