Mahima Chaudhry on cancer Symptoms : भारतात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सोनाली बेंद्रे, महिमा चौधरी, हिना खान या सेलिब्रिटींनाही कर्करोगाचे निदान झाले. सोनाली बेंद्रे व महिमा चौधरीने कर्करोगावर मात केली आहे. तर हिना खानवर उपचार सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री प्रिया मराठेचं कर्करोगामुळे निधन झालं. महिमा चौधरीने कर्करोगाविषयी बोलताना लक्षणांबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
बॉलीवूड अभिनेत्री महिमा चौधरीने स्तनाच्या कर्करोगावर मात केली. या गंभीर आजारातून बरी झाल्यापासून ती त्याबद्दल बोलते, जनजागृती करतेय. महिमाने आता खुलासा केला आहे की तिला रुटीन चेकअपसाठी गेल्यावर स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. तिला त्यापूर्वी कर्करोगाची कोणतीही लक्षणे दिसली नव्हती. लवकर निदान आणि त्वरित उपचारांसाठी महिलांनी दरवर्षी तपासणी करून घ्यावी असं आवाहन महिमा चौधरीने केलं आहे.
कर्करोगाचे निदान झाले तेव्हाची आठवण सांगताना महिमा चौधरी म्हणाली, “कोणतीही लक्षणे नव्हती. मी स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी गेले नव्हते. मी फक्त वार्षिक रुटीन चेकअपसाठी गेले होते. मला अजिबात कल्पना नव्हती की मला स्तनाचा कर्करोग झाला आहे. कर्करोग हा एक असा आजार आहे जो तुम्ही स्वतः लवकर ओळखू शकत नाही. तो फक्त तपासणीद्वारेच कळू शकतो. म्हणून जर तुम्ही दरवर्षी तपासणी करत राहिलात तर तुम्ही तो लवकर ओळखू शकाल आणि लवकर उपचार घेऊ शकाल.”
भारतातील कर्करोगाच्या उपचाराबद्दल महिमा चौधरी म्हणाली…
५२ वर्षीय महिमा चौधरीच्या मते, तिला निदान झाल्यापासून भारतातील कर्करोगाच्या उपचारांमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. “३-४ वर्षांपूर्वी मला कर्करोगाचे निदान झाल्यापासून मी भारतात कर्करोगाच्या उपचारांमध्ये मोठा बदल झालेला पाहिला आहे. अनेक जेनेरिक औषधे आता खूपच स्वस्त झाली आहेत. कर्करोगाविषयी जागरूकता देखील वाढली आहे. कर्करोगाविरुद्ध धैर्याने लढणाऱ्या इतरांच्या कथा ऐकून मला खूप प्रेरणा मिळते,” असं महिमा चौधरीने नमूद केलं.
