बॉलीवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या राहत्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे चर्चेत आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या तुरुंगात बंद आहे, पण त्याच्या नावाने कॅब बुक करून ती अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरी पाठवल्याप्रकरणी गाझियाबादच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.

रोहित त्यागी असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रोहितला त्याच्या गावातून अटक करण्यात आली. त्याने बुधवारी कथितरित्या सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सपासून वांद्रे पोलीस स्टेशनपर्यंतच्या प्रवासासाठी ऑनलाइन कॅब बुक केली. जेव्हा कॅब ड्रायव्हर पत्त्यावर पोहोचला तेव्हा त्याला समजलं की कुणीतरी खोडसाळपणा केलाय, मग कॅब चालकाने तक्रार दाखल केली.

सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”

सलमान खानच्या घरावर १४ एप्रिल रोजी गोळीबार झाला, त्यामुळे सुरक्षा वाढविण्यात आली आहे. याचदरम्यान घडलेल्या या घटनेची गंभीर दखल घेत वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यागीचा शोध घेतला आणि त्याला अटक करण्यात आली आहे. गेल्या रविवारी सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना दुसऱ्याच दिवशी अटक करण्यात आली असून ते आता पोलीस कोठडीत आहेत. या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने घेतली होती.

सलमान खानचं गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर कसं दिसतं? पाहा Inside Photos

सलमानच्या घरावर गोळ्या झाडणारे विकी गुप्ता व सागर पाल दोघेही बिहारचे रहिवासी आहेत. त्यांना घटनेच्या दुसऱ्या दिवशी गुजरातमधील भुज इथून अटक करण्यात आली होती. सलमान खानला मारणं नाही, तर फक्त घाबरवणं हा गोळीबाराचा हेतू होता. गोळीबार करण्यासाठी चार लाख रुपयांची सुपारी घेतल्याचं दोन्ही आरोपींनी पोलिसांना सांगितलं होतं.